अमरावती - अमरावती - रविवारी जनता कर्फ्यूमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. मात्र, संकट अद्याप टळलं नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कोरोना संदर्भात जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर म्हणाल्या या संकटकाळात जिल्ह्यातील दूध आणि संत्री उत्पादकांनी घाबरून जायची गरज नाही. संत्रा उत्पादकांचा संत्रा महाराष्ट्रात आरामात पोहोचला मात्र, राज्याबाहेरही संत्र्याची निर्यात कशी काय करता येईल याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत असून व्यापाऱ्यांना आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण जाणार नाही यासाठी जेवढी काळजी घेता येईल तेवढी सगळी काळजी घेण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संदर्भात लोक जागरूक असल्याचे पाहायला मिळते. परंतु, ग्रामीण भागामध्ये मात्र कोरोनामुळे काहीच होत नाही असे अनेकांना वाटत आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये आणखी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मेळघाटातील परिस्थितीबाबतही आम्ही आजच्या बैठकीत चर्चा केली. परिस्थिती हाताबाहेर गेली तर, आपण संपूर्ण काळजी घेण्याची व्यवस्था जिल्ह्यात करतो आहे. वलगाव येथे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणि तिवसा येथील तालुका रुग्णालयात आयसोलेशन सेंटर सुरू केले जाणार आहेत. नागरिकांना घाबरायची गरज नाही. मात्र, सर्वांनी निश्चितपणे काळजी घ्यायला हवी असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.