चुरणी गावातील हिरड्यांविषयी माहिती देताना अमरावती:मेळघाटातील आदिवासी बांधव हे विविध वनौषधींचे जाणकार आहेत. येथे घरोघरी हिरडा ठेवला जातो. वाचनासाठी हिरडा हा अतिशय गुणकारी असून मुळव्याधीवर तो रामबाण इलाज आहे; मात्र कुठल्या आजारावर हिरडा हा कशा पद्धतीने घ्यायचा याबाबत जाणकारांकडून योग्य सल्ला घेणे महत्त्वाचे असते.
प्रमाणाची जाणीव आवश्यक:वनौषधीचे जाणकार प्राचार्य डॉ. पृथ्वीसिंह राजपूत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, कोणत्या आजारात हिरडा हा किती प्रमाणात घ्यायचा तसेच लहान मुलांना, प्रौढांना तसेच वृद्धांना किती प्रमाणात द्यायचा याविषयी जाणकार वैद्याचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. हिरड्याच्या वनौषधी गुणांबाबत शास्त्रोक्त अभ्यास असणे आवश्यक आहे.
रोजगाराचे साधन:चुरणी हे हिरड्याचे मेळघाटातील मुख्य व्यापारी केंद्र आहे. इंदोर, भोपाळ आणि परतवाडा येथून व्यापारी हिरडा खरेदीसाठी चुरणी गावात येतात. इंदोर येथून हिरडा थेट दिल्लीपर्यंत जातो. चुरणीसह लगतच्या गंगाखेड, कोटमी, तोरणवाडी, कान्हेरी, कानडा, जाळीदार यासह लहान-मोठ्या अशा एकूण 40 गावांमध्ये मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात ग्रामस्थ जंगलातून हिरडा गोळा करून आणतात. या संपूर्ण परिसरातील हिरडा हा चुरणी गावात असणारे पाच ते सहा व्यापारी खरेदी करतात. किलोमागे पाच रुपये हिरड्यावर मिळतात. एक व्यक्ती दिवसभरात 30 ते 40 किलो हिरडा जंगलातून जमा करून आणतो, अशी माहिती चुरणी येथील रहिवासी रघुनाथ आलोकार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
गावाचे वैशिष्ट्य:चुरणी या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे गाव अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात येत असले तरी गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही मार्ग मध्य प्रदेशातून जातात. चुरणीला बहिरमच्या दिशेने जाताना मध्य प्रदेशातील तीन ते चार गाव पार करावी लागतात. घटांग मार्गे चुरणीला जाताना देखील मध्य प्रदेशातील तीन गाव मार्गात लागतात.
हिरड्यामधील औषधी गुण:हिरडा या वनौषधीला आयुर्वेदातील सर्वांत महत्त्वाचे औषध मानले जाते. त्रिफळा चूर्णामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे हिरडा होय. हा पित्तनाशक, कपनाशक, वायुनाशक असतो. कफवर देखील हिरडा अतिशय गुणकारी आहे. दमा आणि उचकीसाठी देखील हिरडा आणि सुंठ हे औषध दिले जाते. आयुष्यभर कधीही कोणताही रोग होऊ नये यासाठी सायंकाळी झोपताना दोन हिरड्यांची पूड खावी. यासोबत तापलेले दूध आठवड्यातून एकदा घेणे अतिशय लाभदायक असल्याचे आयुर्वेदातील जाणकार सांगतात. डोळे येणे, पांडूरोग, ओकारी होणे, अजीर्ण होणे, गरमीचे चट्टे, उरण इत्यादींवर हिरडा गुणकारी आहे.
हेही वाचा:
- Stone Masons Story : छन्नी-हातोड्याने देतात काळ्या पाषाणाला आकार; पण 'त्या' चिमुकल्यांचे शिक्षण वाऱ्यावर
- Odisha Train Accident : तीन नाही तर एकाच ट्रेनचा झाला अपघात; रेल्वे बोर्डाची महत्वाची माहिती
- Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात; मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू, भुवनेश्वरमधील एम्समध्ये ठेवण्यात येणार 100 मृतदेह