अमरावती- मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी दरवर्षी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केल्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु मेळघाटमधील आरोग्य यंत्रणेला लागलेली ढिसाळ कारभाराची कीड मात्र कमी होण्याचे नाव घेत नाही. आरोग्य केंद्रातून दुसऱ्या रुग्णालयात उपचार करण्यास नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका अडीच वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला आहे.
धक्कादायक: आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू सोहन सुनील पटोकर असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील माजंरकापडी गावातील सोहन सुनिल पटोकर या अडीच वर्षीय आदिवासी बालकाची प्रकृती २६ तारखेला रात्री अचानक खराब झाली होती. रात्री घरगुती उपचार करून त्याच्या आई वडिलांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला गौरखेडा बाजार मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी आणले होते.यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मुलावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी अचलपूर येथील रुग्णालयात घेऊन जाण्याकरिता मुलाच्या पालकाना सांगितले. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका दीड ते दोन महिने पासुन नादुरुस्त असल्याने या मुलाला घेऊन जाणार तरी कसे असा प्रश्न त्या मुलाच्या पालकांना पडला.
दरम्यान काही वेळानंतर या घटनेची माहिती तेथील सरपंच या मिळताच त्यांनी या आरोग्य केंद्रात भेट दिली. मात्र बालकाची ढासळती प्रकृती लक्षात घेता या बालकाला सरपंच अल्केश महल्ले यांनी त्यांच्या स्वत:च्या गाडीमध्ये घेऊन गेले व अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र रुग्णवाहिकेच्या शोधात वेळ निघून गेल्याने शेवटी या अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. जर कदाचित आरोग्य विभागाची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली असती तर या निष्पाप मुलाचा जीव वाचला असता. एकीकडे मेळघाटातील आरोग्य यंत्रणेवर लाखो रुपये खर्च केल्याचा दावा सरकार केला जात असला तरी आदिवासी लोकांची आरोग्य सुविधा साठी होणारी फरफट मात्र काही कमी झाली नाही.
आता या आदिवासी मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान गौरखेडा बाजार येथील आरोग्य केंद्रातील रुग्णावाहिका ही दीड महिन्यापासून अमरावती येथे दुरुस्तीसाठी नेली असून सध्या लॉकडाऊनमुळे ती रुग्णवाहिका दुरुस्त होऊ शकली नाही. परंतु आम्ही त्या मुलासाठी दुसऱ्या वाहनांची व्यवस्था केली होती पण सरपंच त्या मुलाला घेऊन अचलपूरला उपचारासाठी घेऊन गेले होते, अशी प्रतिक्रिया चिखलदरा तालुका आरोग्य अधिकारी प्रधान यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली