अमरावती : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. तसेच जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात चिखलदरा तालुक्यातील आमझरी या पर्यटनस्थळ क्षेत्रात दरड कोसळली आहे. यामुळे या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर पर्यटकांना या परिसरात जाऊ नये असा इशारा, प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
चिखलदरा घटांग मार्ग बंद: चिखलदऱ्यावरून घटांगला येताना लागणाऱ्या आमझरी येथे उंच पाडावरील दरड कोसळून रस्त्यावर पडली. यामुळे चिखलदारा घटांग मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून जाणारी वाहने इतर मार्गे वळविण्यात आली आहेत. सध्या मेळघाटात पावसामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. चिखलदरा येथे जाण्याकरिता धामणगाव गडी येथून मार्ग खुला करण्यात आला आहे. घटांग मार्गावर दरड कोसळल्यामुळे चिखलदरावरून घटांगला येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
आमझरी आहे पर्यटन केंद्र :चिखलदरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या, आमझरी गावालगत वनविभागाच्या वतीने खास पर्यटनस्थळ सुरू केले आहे. गत चार वर्षांपासून या पर्यटन स्थळाला पर्यटकांनी मोठी पसंती दर्शविली आहे. या ठिकाणी मेळघाटातील पावसाचा आनंद घेण्यासाठी काही पर्यटक आले आहेत. तर दरड कोसळल्यामुळे इतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच आमझरी येथे आलेले सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती, प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन : अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटातील सर्वांत उंच थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या, चिखलदरा येथे पहिल्यांदाच शासनाच्या वतीने मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन केला आहे. या पर्यटन महोत्सवानिमित्त विदर्भातील विविध जिल्ह्यांसह थेट मुंबई, पुण्यातून पर्यटकांची गर्दी चिखलदरा येथे उसळली आहे.
हेही वाचा-
- Amravati News: कोरकू परंपरेत बंधन सोहळा; मेळघाटात नदीच्या काठावर होतो विधी
- Melghat Waterfall : पांढऱ्या शुभ्र पाण्यासह मेळघाटातील धबधबे मोहरले; पर्यटकांची उसळली गर्दी
- Mansoon Tourism Festival : पहिल्या मान्सून पर्यटन महोत्सवाला चिखलदऱ्यात उसळली पर्यटकांची गर्दी