अमरावती - शादी डॉटकॉमवर मैत्री झालेल्या महिलेची फसवणूक करत तिला 26 लाख रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महिला तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. तिला 2 मुले आहेत. पुन्हा आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी तिने शादी डॉटकॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली. दरम्यान, तिची मुंबईमधील अजयसिंग अग्रवाल या तरुणाशी ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरु झाले. दोघांच्या मैत्रीला पालवी फुटत असतानाच अजयसिंगने पीडित महिलेला आपण कंत्राटदार आहोत, आपले मुंबईत दोन फ्लॅट असल्याची खोटी माहिती दिली. अजयसिंगने दिलेल्या माहितीवर या महिलेने विश्वास ठेवला. यानंतर आपल्याला या व्यवसायात कंत्राटदाराकडून फसवणूक झाली असे सांगत महिलेकडे पैशाची मागणी केली. अजयसिंगने आधी 15 ते 20 लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्याने 2 लाख, नंतर 20 लाख यानंतर पुन्हा 1 लाख, पुन्हा 90 हजार आणि शेवटी 2 लाख रुपये घेत एकूण 26 लाख रुपयांचा चुना लावला आहे.