अमरावती - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाते. मात्र, यावर्षी सोयाबीनवर खोडकिडसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी शेती बांधावर जाऊन सोयाबीनची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सोयाबीन पिकांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक अमरावती दौऱ्यावर - अमरावती सोयाबीन पिकांचे नुकसान
सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर आले आहे. त्यांनी शेती बांधावर जाऊन सोयाबीनची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात सोयाबीनवर आलेल्या खोडकिड्यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. तर काही ठिकाणी अज्ञात विषाणूंच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पीक पिवळे पडले आहे. त्यामुळे फुलोरा व शेंगा गळून पडुन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हाती आलेले सोयाबीनचे पीक नष्ट झाल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
आज केंद्रीय पथकाने अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील सातरगाव येथून या पाहणी दौऱ्याला सुरवात केली. यात सातरगाव येथील नाना काळकर यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केंद्रीय पथकाच्या गटाने केले. जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी, चांदुरबाजार, अचलपूर, भातकुली, अमरावती अशा नुकसानग्रस्त तालुक्यात हे पथक सोयाबीन नुकसानीची पाहणी करणार आहे. केंद्रीय पाहणी पथकाचे डॉ.शंकरा, प्रल्हाद कोल्हे, जिल्हा कृषी अधिकारी विजय चव्हाळे आदी उपस्थित होते.