अमरावती- कोरोना साथीवरील नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’चे पालन होणे आवश्यक आहे. त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता या नियमांचे पालन करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने आज (गुरूवारी) अमरावतीत दिले.
केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा या पथकात समावेश आहे. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाकडून कोरोना उपाययोजनांबाबत बैठकीद्वारे माहिती घेतली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा, पालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सादरीकरण केले.
दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना द्या
कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. नागरिकांकडून कोविड ॲप्रोपिएट बिहेवियरचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मास्क हे कोरोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे. दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात. दक्षता त्रिसूत्री ही जीवनशैलीचा भाग व्हावी. प्रशासन व आरोग्य यंत्रणा सांघिक भावनेतून कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहे. असेच टीमवर्क ठेवावे, असेही निर्देश पथकाने दिले.