अमरावती -अमरावती महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी घेऊन वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचा प्रकरण समोर आले आहे. यातून महापालिकेला चक्क 75 लाख रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार महापालिका आयुक्तांच्या वेळीच लक्षात आल्याने या प्रकरणाची तक्रार आता शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शहरी भागात हगणदारी मुक्त करण्यासाठी शासनाकडून वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आले. 2014-15 मध्ये राबविण्यात आलेल्या या अभियाना अंतर्गत ज्या व्यक्तींकडे शौचालय नाही, अशा व्यक्तींना शासनाकडून 12 हजार रुपये आणि महापालिकेकडून 5 हजार रुपये असे एकूण 17 हजार रुपये देऊन नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास आर्थिक मदत देण्यात आली.
दरम्यान, अमरावती महापालिकेच्या बडनेरा झोन अंतर्गत ज्या गरजू व्यक्तींनी शौचायलय बांधले नाही, अशा व्यक्तींकडे कंत्राटदाराच्या माध्यमातून शौचालय बांधून देण्यात आले होते. दरम्यान, बडनेरा झोन अंतर्गत लाभार्थ्यांकडे शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर या कामाच्या देयकाची फाईल कंत्राटदारामार्फत महापालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आली. या कामाचे देयक काढणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर ही फाईल आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे आली. आयुक्तांनी ही फाईल तपासली असता यावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या बाबत त्यांना संशय आला.