अमरावती -नागपूरवरून अंजनगावकडे जाणाऱ्या कारचा दर्यापूरमधे टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात समोरून येणारा दुचाकी चालकाला जबर धडक बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असून दोन दुचाकी चालक गंभीर जखमी आहेत.
असा झाला अपघात -
आज दर्यापूरतील अमरावती रोड स्थित पेट्रोल पंपाजवळ नागपूर येथून येणाऱ्या इंडिका कारचा समोरचा टायर अचानक फुटल्यामुळे कारने जोरदार पलट्या घेतल्या. यात समोरून येणाऱ्या दुचाकी चालक योगेश मनोहर राऊत (40) व अक्षय मनोहर राऊत (35) रा. अंबाबाई सांगळुद तालुका जिल्हा अकोला हे आपल्या दुचाकीवरून अमरावतीकडे जात होते. यावेळी अपघात ग्रस्त कार एमएच 31 डीसी 9672 पलट्या घेत अचानक या दुचाकीवर आदळली. यामध्ये योगेशचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा भाऊ अक्षय हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच या अपघातात दर्यापूरतील आदर्श विद्यालयातील शिक्षक प्रशांत दिगंबर गावंडे (40) यांचा उजवा पाय निकामी झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.