अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्वच शाळा महाविद्यालये बंद आहेत. मात्र, दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, आता दिवाळीनंतरही कोरोनाचे संक्रमण वाढतच राहले तर, राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्यच राहील, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी क्लब शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचाही विचार करू, असेही बच्चू कडू म्हणाले.
दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण राज्यात वाढत असले तरी, आता शाळा सुरू करण्याची मागणीही होत आहे. अशातच दिवाळीनंतर कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्याचे संकेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले होते. आपण आधी ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. मात्र, कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता दिवाळीनंतर याची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.