अमरावती- भावाचा मृत्यू झाल्याने दापोलीला बस थांबविण्याची विनंती करणारा पोलीस कर्मचारी आणि वाहक यांच्यात आज सकाळी बसस्थानकात जोरदार वाद झाला. या वादात पोलीस कर्मचाऱ्याने वाहकाला काठीने मारहाण केली. या घटनेमुळे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंदची घोषणा केल्यानंतर दीड तास बस सेवा ठप्प झाली होती. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद नागले यांच्याविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अमरावती छिंदवाडा ही बस आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फलाटावर लागत होती. यावेळी पोलीस कर्मचारी विनोद नागले यांनी वाहक प्रवीण रामदे यांना बस दापोली येथे थांबेल का, असा प्रश्न केला. यावर वाहकाने बस दापोलीत थांबत नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर नागले यांना वाहकाने बाजूला सरकायला सांगितले. यावेळी नागले यांनी भावाचे निधन झाल्याचे सांगून मोर्शीचे तिकीट देण्याबाबत विचारणा केली. तसेच दापोलीला उतरू द्या, अशी विनंती केली होती. यावेळी तिकीट देण्यावरून वाहक आणि पोलिसात बाचाबाची झाली. यानंतर पोलीस कर्मचारी नागले हे पोलीस चौकीतून कर्मचाऱ्याला घेऊन आले. त्यांच्या हातातील काठी घेऊन वाहक रामदे यांना काठीने मारले. या प्रकारानंतर बसस्थानकात एकच खळबळ उडाली.