महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्मजात 'नेत्रहीन' असलेल्या अमरावतीच्या सार्थकचे दहावीत 'नेत्रदीपक' यश - ssc result

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने दहावीत ८२.२० गुण मिळवले. त्याचे हे यश अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे.

सार्थक किशोर श्रीखंडे

By

Published : Jun 11, 2019, 6:22 PM IST

Updated : Jun 11, 2019, 8:34 PM IST

अमरावती- दहावीचा निकाल नुकताच लागला. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत यशाचे शिखर गाठले. परंतु, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सार्थक किशोर श्रीखंडे हा काही खास आहे. अमरावतीचा सार्थक हा जन्मता नेत्रहीन आहे. डोळ्यांनी दिसत नसतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने दहावीत ८२.२० गुण मिळवले. त्याचे हे यश अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे.

अनेकांना प्रेरणा देणारे सार्थकचे यश

अमरावती शहरातील जिल्हा परिषद (माजी शासकीय मुलांची शाळा) शाळेमध्ये सार्थक दहावीला होता. या वर्षी शाळेत ७ अंध व ४० सर्वसामान्य असे एकूण ४७ विद्यार्थी होते. या ४७ मधील ४० डोळस विद्यार्थ्यांना मागे टाकत नेत्रहीन असलेल्या सार्थकने प्रथम क्रमांक पटकावला. या यशाने त्याच्या कुटुंबीयांना गहिवरुन आले. त्याने केलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचेही त्याचे वडिलांनी प्रतिक्रिया दिली.

सार्थकच्या यशामध्ये त्याच्या कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. घरातील सर्व कामे करून त्याची आई सार्थकचा अभ्यास घेत असे. नेत्रहीन असल्यामुळे त्याला पुस्तकामधून प्रश्नोत्तरे वाचून दाखवावी लागत. तो ती उत्तर मन देऊन ऐकत असे. तसेच ऑडिओ क्लिपच्या माध्यमातूनही तो अभ्यास करत असे. त्याची आजीही त्याचा अभ्यास घेत असे. आपल्या मुलाने नावाप्रमाणेच आमचे स्वप्न सार्थक केल्याची भावना त्याच्या आईने व्यक्त केली.

सार्थकला अभ्यासासोबतच सामान्य ज्ञान वाचायची आवड आहे. क्रिकेट विषयी त्याला असलेले ज्ञान तर अगदी भन्नाटच आहे. याचबरोबर तो अंवातर वाचनही करतो. तसेच त्याला हार्मोनियम वाजविण्याचा छंद आहे. भविष्यात आता सार्थक स्पर्धापरीक्षेची तयारी करणार असून मोठा अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न आहे.

Last Updated : Jun 11, 2019, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details