अमरावती -देशभर धावणाऱ्या भारतीय रेल्वेतील वातानुकूलित बोगीमध्ये खिडक्यांना लावण्यात आलेले पडदे काढण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांना रात्री झोपताना दिल्या जाणाऱ्या ब्लँकेटची सेवाही बंद करण्यात आली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोना: रेल्वेच्या वातानुकूलित बोगीतील पडद्यांसह ब्लँकेटची सेवा बंद - ब्लँकेटची सेवाही बंद
देशभर धावणाऱ्या भारतीय रेल्वेतील वातानुकूलित बोगीमध्ये खिडक्यांना लावण्यात आलेले पडदे काढण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांना रात्री झोपताना दिल्या जाणाऱ्या ब्लँकेटची सेवाही बंद करण्यात आली आहे.
कोरोनमुळे संपूर्ण जग हादरले असताना, रेल्वेने आपल्या प्रवाशांची काळजी घेण्यासाठी नवीन निर्णय जाहीर केले आहेत. कोरोना विषाणू हे कपड्यांवर अधिक काळापर्यंत जिवंत राहतात. रेल्वेमध्ये देशातील विविध भागातून येणारे प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना वातानुकूलित बोगीमध्ये देण्यात येणारे ब्लँकेट रोज धुणे शक्य नाही. तसेच गाडीमध्ये खिडक्यांना लागलेले पडदेसुद्धा रोज धुणे अशक्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित बोगीतील पडदे आणि ब्लॅँकेटची सेवा प्रवाशांना देण्याचे टाळले आहे.
रेल्वेच्या बोगीतील वातानुकूलित संचाचे तापमान सर्व प्रवाशांना जसे हवे तसे नियंत्रित ठेवण्याचे आदेशही रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना ब्लँकेटची गरज पडणार नाही. याची काळजीही रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. ज्या प्रवाशांना काहीही झाले तरी ब्लँकेटची गरज लागेल, त्यांनी रेल्वेच्या बोगीत उपस्थित परिचारकाशी संपर्क साधण्याचे आवहानही रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.