अमरावती -अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची राज्य शासन थट्टा करीत असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, शुक्रवारी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय येथे भाजपच्या वतीने चुन भाकर आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
माहिती देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे ...असे आहे आंदोलनाचे स्वरूप
अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. यामुळे तहसीलादर, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर चुन भाकर, पिठले भाकर देऊन भाजप कार्यकर्ते काळी दिवाळी साजरी करतील. कार्यकर्ते स्वतः चुन भाकर खाऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनाही खाऊ घालणार आहेत.
....या आहेत मागण्या
शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई शासनाने द्यावी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, संत्रा, केळी व इतर फळबागांच्या विम्याचे बदललेले निकष त्वरित रद्द करावे, रासायनिक खते, बियाणांचे रास्त दरात पुरवठा करावे, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करावे, आशा मागण्याही या आंदोलनादरम्यान केल्या जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
डॉ. नितीन धांडे यांच्या विजयासाठी पक्ष एकवटला
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी डॉ. नितीन धांडे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली असल्याचे बावनकुळे म्हणले. डॉ. धांडे यांच्या विजयासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते एकवटले असून, विजय आमचाच होणार, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, शिक्षक मतदान संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे, पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
हेही वाचा -आयुष्याच्या 'संध्याकाळी' वृद्धाश्रमात दिवाळी साजरी