अमरावती- अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरून पत्रकारांनी भाजपच्या दुहेरी भूमिकेबाबत प्रतिसवाल केला असता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संतापले. त्यामुळे पाटील यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मरावती विभागीय पक्ष कार्यकर्ता बैठकीसाठी अमरावतीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
अर्णव गोस्वामीच्या विषयावरून चंद्रकांत पाटील यांची अरेरावी; पत्रकार परिषदेत गोंधळ - अर्णब प्रश्नी चंद्रकांत पाटलांचा संताप
अमरावतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांना अर्णब गोस्वामी प्रकरणावरून प्रश्न विचारला असता, ते संतापले होते. तसेच त्यांनी एका पत्रकारास अरेरावीची भाषाही केली. मात्र, त्यांना या चुकीची जाणीव होताच त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
अमरावती विभाग शिक्षक संघाच्या निवडणुकीत भाजप आपला अधिकृत उमेदवार देणार आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सूतोवाच केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध नोंदवला. तसेच राज्य सरकारच्या कारवाईविरोधात टीकाही केली. त्यानंतर पत्रकारांनी भाजपने सुद्धा अनेक पत्रकारांची मुस्कटदाबी केली आहे, मग आता तुम्हाला अर्णव गोस्वामीचा पुळका का येतो आहे? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी चंद्रकांत पाटील पत्रकारांवरच संतापले, त्यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला.
पाटलांच्या या अरेरावीपणावर पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना तुम्हीच पत्रकारांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात, असे सुचित केले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शांत होत माझी चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत पत्रकार परिषद गुंडाळली.