अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक मनोहर भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी मनोहर भिडे गुरुजींचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला होता. या संदर्भात आज भाजप खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात ठाकूर यांच्याविरुद्ध तक्रार दाखर केली आहे.
यशोमती ठाकूर यांचे तोंड बंद : काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी मनोहर भिंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी जेव्हा विधानसभेत भारत माता की जय मी म्हणणार नाही असे जाहीरपणे बोलतात. त्यावेळी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे तोंड बंद असते. राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिक यांच्या संदर्भात देखाल त्यांची भूमीका संशयस्पद असल्याचे बोंडे म्हणाले.
भिडे गुरुजींचा अपमान सहन करणार नाही : भिडे गुरुजींचा अपमान आम्हाला अजिबात सहन होणार नाही. आमदार यशोमती ठाकूर यांनी मनोहर भिडे गुरुजींचा अपमान केल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. अनिल बोंडे यांच्यासोबत शिवप्रतिष्ठान पदाधिकारी तसेच कार्यकर्ते देखील कोतवाली पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
भिडेंचा भाजपशी संबंध नाही :भिडे गुरुजींचा भाजपशी कुठलाही संबंध नाही. मात्र, एक हिंदू व्यक्ती म्हणून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांनी भिडे गुरुजींबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. यशोमती ठाकूर यांना भिडे गुरुजींबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा, अशी आमची मागणी असल्याचे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.