अनिल बोंडे यांची एकनाथ शिंदेंवर टीका अमरावती :उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना मुंबई म्हणजेच अख्खा महाराष्ट्र आहे असे वाटायचे. आता उद्धव ठाकरेंप्रमाणेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असे वाटायला लागले असल्याची टीका खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वाशिम येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे. डॉ. अनिल बोंडे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही :आपल्या विदर्भात बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही अशी म्हण आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आदरणीय आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षाने तसेच संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारले आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असावे असे मला वाटत असल्याचे देखील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस हा बहुजनांसाठी काम करणारा चेहरा :ओबीसींचे प्रश्न, मराठा आरक्षण, धनगर समाजाच्या भल्याचा विषय, आदिवासी कल्याणाचे काम, अनुसूचित जातीच्या कल्याणाचे काम, दिव्यांगांच्या विकासाचे काम असो सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचे काम हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करीत आहेत. आजच्या घडीला खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस हाच एकमेव चेहरा बहुजनांसाठी काम करणारा असल्याचे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
संयम बाळगावा :भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या या कडवट प्रतिक्रियेवर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी संयत प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात ही शिवसेनेची अधिकृत जाहिरात नसल्याचे शंभूराज देसाई म्हणाले. शिवसेनेने ही जाहिरात दिलेली नाही. शिवसेनेच्या एका हितचिंतकाने ते जाहीर केले आहे. या घोषणेमुळे दोन्ही पक्षांमध्ये काही संभ्रम निर्माण झाल्यास दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते चर्चेतून ते दूर करतील. खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया मी ऐकली असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका करणे योग्य नाही. त्यांनीही संयम बाळगावा अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Criticized CM : सरकारच्या जाहिरातींवरून विरोधी अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका, जाहिरात देणारा हितचिंतक कोण?