महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीजबिलाविरोधात अमरावतीत भाजपाचे आंदोलन - amravati breaking new

आंदोलनावेळी राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.

आंदोलनकर्ते
आंदोलनकर्ते

By

Published : Nov 19, 2020, 3:50 PM IST

अमरावती -लॉकडाऊनदरम्यान राज्यातील जनतेला आलेल्या वाढीव वीज बिला विरोधात आज (दि. 19 नोव्हेंबर) अमरावतीत भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या वतीने विद्युत विभागाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून या मुख्य कार्यालयातील वीज बंद करून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. राज्यातील जनतेला वाढीव वीज बिल देणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजपाच्या वतीने आज करण्यात आली.

लॉकडाऊनदरम्यान राज्यातील नागरिकांना आलेल्या वाढीव बिलातून या नागरिकांना सवलत देण्याचे आश्वासन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. परंतु दिवाळी संपताच बिलातून नागरिकांना कुठलीही सवलत मिळणार नसून पूर्ण बिल नियमित भरावे लागणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात राज्यातील भाजपा आक्रमक झाली असून लॉकडाऊनच्या काळात आलेले सर्व वीज बिल माफ करावे, ही मागणी घेऊन आज राज्यभरात भाजपाच्या वतीने आंदोलन केले जात असतानाच बोंडे यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीमधील विद्युत विभागाच्या मुख्य कार्यालयात आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करून विद्युत कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला.

ऊर्जा मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न

दरम्यान, आंदोलनावेळी राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.

सत्ताधारी आमदार मंत्र्यांच्या घरची वीज खंडित करण्याचा इशारा

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, कोरोनाकाळात कोणाला काम नव्हते, तर 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू व वीज बिलात सवलत देऊ,अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नागरिकांची दिशाभूल केली, असा आरोप बोंडे यांनी केला. तर नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्या सरकारला उजेडात राहू देणार नाही, वीज बिलात सवलत न दिल्यास सत्ताधारी आमदार व मंत्र्यांच्या घरचा वीजपुरवठा खंडित करू, असा इशारा बोंडे यांनी यावेळी दिला.

जळलेल्या घरातही नऊ हजारांचे बिल

मोर्चादरम्यान एका महिलेने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडली. माझे घर जळले असूनही मला 9 हजारांचे बिल आले कसे,असा प्रश्नही यावेळी अधिकार्‍यांसमोर उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details