अमरावती :मेळघाटातील चिखलदरा तालुत्यात बिहाली हे गाव आहे. या गावातील सर्व कुटुंब बांबूंपासून आकर्षक वस्तू बनवण्याच्या व्यवसायात आहेत. बांबूंपासून ते सूप, टोपली, लहान मुलांच्या खेळण्याच्या विविध वस्तू बनवतात. यासह अनेक छोट्या-मोठ्या आणि आकर्षक बस्तू या गावातील प्रत्येत घरात आढळतात. त्यामुळे सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बिहाली हे बांबूंच्या वस्तू बनविणारे गाव म्हणून आज नावारूपास आले आहे. 170 च्या आसपास घरांची संख्या असणाऱ्या या गावात एकूण शंभर घरांमध्ये बांबूंच्या आकर्षक वस्तूंची निर्मिती केली जाते.
बुरड समाजाने जोपासली कला :अनेक वर्षांच्या परंपरेनुसार बुरड समाज हा बांबूपासून सूप, टोपल्या आदी वस्तू तयार करतो. मेळघाटात बिहाली, बुरडघाट या दोन गावांमध्ये बुरड समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. अमरावती धारणी मार्गावर सर्वात आधी लागणारे बिहाली या गावात बुरड समाज बांधवांच्या एकूण सर्व 49 घरांमध्ये बांबूच्या वस्तूंची निर्मिती केली जाते. बुरड समाजाची ही कला गावातील आदिवासी बांधवांनी देखील अंगीकारली असून, बिहारी गावातील 55 ते 60 आदिवासी कुटुंब देखील बांबूंपासून वस्तू तयार करतात. काही आदिवासी युवक देखील बांबूपासून साहित्य निर्मिती शिकले आहेत. आज मेळघाटात येणाऱ्या पर्यटक बिहारी या गावात थांबून घराच्या अंगणामध्ये बांबूंना तासताना अनेक महिला, लहान मुलं, वृद्ध दिसतात. प्रत्येक घराच्या अंगणात मोठ्या प्रमाणात बांबू रचून ठेवलेले दिसतात. काही घरांच्या अंगणात या बांबूच्या कमच्यांपासून आकर्षक वस्तूंची निर्मिती केली जात असल्याचेही दिसते.
घरातील सगळेच या कामात व्यस्त : बिहाली या गावात घरोघरी बांबूंपासून विविध साहित्य निर्मितीचे काम दिवसभर सुरू असल्याने घरातील सगळेच सदस्य या कामात व्यस्त दिसतात. मेळघाटच्या जंगलात मुबलक प्रमाणात असणारा बांबू 40 रुपये प्रति नग प्रमाणे खरेदी केला जातो. बांबूंच्या लहान साहित्यांची सर्वात जवळ असणाऱ्या परतवाडा येथील आठवडी बाजारात विक्री केली जाते. याच लगतच्या छोट्या-मोठ्या गावात देखील या साहित्यांना मागणी आहे. घरातील एक सदस्य आठवड्याला या साहित्य विक्रीतून हजार ते बाराशे रुपये कमवतो.
बांबू मिळण्यास अडचणी : मेळघाटात मोठ्या प्रमाणात बांबूंचे वन असले तरी ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत असल्यामुळे हे बांबू तोडण्यास मनाई आहे. यामुळे बांबू मिळण्यास बऱ्याच अडचणी येतात. मेळघाटात काही संस्थांच्या माध्यमातून बांबू साहित्य खरेदी केले जाते. मात्र, त्यांचा दर परवडत नाही. या संस्थांकडे असणारा बांबू खरेदी करणे देखील महागडे असल्याचे बिहाली येथील ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत" शी बोलताना सांगितले.