बिग बॉसचा विजेता शिवच होणार अमरावती :शिव लहान असताना आमची परिस्थिती फारशी बेताची नव्हती अमरावती शहरातील नगर परिसरात भाड्याने राहत होतो. आता त्याने लहानपणी अंधाराची भीती वाटायची हा जो काही किस्सा सांगितला तो अगदी खरा आहे. आमच्या घरच्या आवारात असणारे शौचालय घरापासून थोडे दूर होते. त्यावेळी रात्रीच्या अंधारात त्याला शौचालयाला जायची खरंच भीती वाटायची. पुढे आम्ही स्वतःचे घर घेतले. पुढे शिवच्या वडिलांनी पान टपरी हा व्यवसाय सुरू केला. शिव लहानपणीपासूनच साधा आणि सोज्वळ होता आताही त्याचा तोच स्वभाव कायम आहे.
शिव लहानपणीपासूनच साधा सोज्वळ : अभ्यासासाठी मात्र त्याने माझ्या हातचा अनेकदा मार खाल्ला. मात्र त्याला माझा कधी राग आला नाही. थोडा मोठा झाल्यावर त्याला राग आला किंवा टेन्शन आले की तो 15 ते 20 मिनिटांसाठी अबोल व्हायचा. मात्र काही वेळेस शांत झाल्यानंतर पुन्हा तो रुळायचा. त्याचा हा स्वभाव आज देखील कायम आहे. आपली चूक झाली तर पटकन सॉरी म्हणून माफी मागणे, हा त्याचा लहानपणापासूनचाच गुण आहे. लहान असताना छोट्या मुलांसोबतच वयाने मोठ्या असणाऱ्या मुलांची देखील त्याची मैत्री होती. परिसरातील गणपती उत्सव असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो तो आनंदाने सहभागी व्हायचा. आमच्या घराच्या परिसरात असणाऱ्या गोंड बाबा मंदिरात दरवर्षी नागपंचमीला यात्रा भरते, लहानपणी या यात्रेत शिवने आम्हाला पोतभर नारळ विकत घेऊन मागितले आणि त्याने चक्क हे नारळ विकण्याचे काम यात्रेत केले. त्यावेळी त्याचे केवळ तीनच नारळ विकले गेले अशी आठवण देखील शिवचा आईने सांगितली.
सर्वांशीच शिवचे चांगले संबंध :परिसरातील सर्वांशीच शिवचे चांगले संबंध होते. अशावेळी मित्रांसोबत तो हॉटेलमध्ये गेला तेव्हा दारू पिणारे मित्रसोबत असले तरी त्याने कधी दारूला हात लावला नाही. सर्वांसोबत राहून देखील कुठलेही चुकीचे गुण अंगीकारले नाही. सर्वांसोबत राहायचे मात्र आपला मार्ग सोडायचा नाही असे मी त्याला लहानपणीपासून सांगत आले. त्याने क्रिकेटचे सामने देखील आयोजित केले होते. यासाठी आमदाराची खासदारांची भेट देखील तो घ्यायचा. परिसरातील नगरसेवक देखील त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहायचे. अगदी लहान असताना तो कुत्र्याचे वाढदिवस देखील साजरा करायचा आणि त्याचा लाडका कुत्रा दगावल्यावर त्याचा अंत्यसंस्कार देखील तो अगदी व्यवस्थितपणे पार पाडायचा असे देखील शिवच्या आई म्हणाल्या.
सर्वांच्या साथीने बिग बॉस मध्ये मिळणार विजय :शिवचे आज प्रचंड मोठे फॅन फॉलोवर्स आहेत. आता बिग बॉसचा 16 वा आणि अंतिम आठवडा सुरू होतो आहे. 12 फेब्रुवारीला बिग बॉसचा विजेता घोषित होणार आहे. आतापर्यंत बिग बॉसमध्ये शिवने सर्वच टास्क अतिशय योग्यरीत्या पूर्ण केल्या आहेत. आपल्या अमरावतीसह संपूर्ण विदर्भ आपला महाराष्ट्र भारत आणि भारताच्या बाहेर असणाऱ्या शिवच्या चाहत्यांना मराठी प्रमाणेच आता हिंदी बिग बॉसचा विजेता देखील आपला शिवच होणार अशी अपेक्षा आहे. माझा शिव नक्कीच विजयी होणार अशी पूर्ण खात्री मला असल्याचे देखील आशा ठाकरे म्हणाल्या.
हेही वाचा :Siddharth and Kiara Wedding : सिद्धर्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नात पाहुण्यांची वर्दळ वाढली