अमरावती - मान्सून हा काही दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यातच पैशाची जूळवाजूळव देखील शेतकरी करत आहे. घरी असलेला शेतमाल आता बाजारपेठेत विकायला नेत आहे. लॉकडाऊनमुळे बाजार समिती बंद होती. त्यात केंद्र सरकारने डाळ आयात केली आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतमालांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. त्यातच खतांच्या व बियाण्यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.
दरात झाली घसरण
राज्यात मागील १५ महिन्यापासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील बाजार समित्या सुद्धा काही दिवस बंद होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांचा माल घरीच पडून होता. पैशाअभावी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीचे कामे रखडले आहे. त्यात आता पेरणीसाठी पैसे हवे म्हणून शेतकरी आपला शेतमाल बाजार समित्यामध्ये नेत आहे. परंतु प्रत्येक शेतमालाचे भाव हे प्रतिक्विंटल पाचशे ते आठशे रुपयापर्यंत कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे.सध्या बाजारपेठेत शेतकरी हरबरा, तूर, मूग आदी शेतमाल घेऊन विकण्यासाठी घेऊन जात आहे. मात्र या पीकांचे दर घसरल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन, मूग, तूर या पीकांच्या दरात ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.