महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती: भवानी मंदिर परिसरातील लोकांचे आयुष्य 'धुळीत'...

अमरावती शहराजवळ असणाऱ्या रहाटगाव लगत वडगाव माहुरे मार्गावरील भवानी मंदिर परिसरात जवळपास 17 ते 18 स्टोन क्रशर असून या भागात 24 तास धूळ उडते. याभागातील स्टोन क्रेशर आता बंद होतील, असे घरात राहायला आल्यावर नागरिकांना वाटले असताना तीन-चार वर्षांपासून हे क्रशर बंद झालेले नाहीत. या भागातील क्रशर रोज धडधडायला लागतात आणि संपूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणात धुळीचे कण पसरतात.

भवानी परिसर
स्टोन क्रशर

By

Published : Dec 11, 2019, 9:59 AM IST

अमरावती- आपल्या हक्काचे सुंदर घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर वास्तवात साकारल्यावर या घराभोवती 24 तास माती किंवा धूर उडत असेल, घरालगतच्या वातावरणात अनेक आजारांची उत्पत्ती होऊन शेजारची माणसे दगावत असतील तर असे घर आणि अशा आयुष्याला काय म्हणावे, असा प्रश्न वडगाव माहुरे मार्गावर असलेल्या भवानी परिसरातील रहिवाशांना पडला आहे. आपले आयुष्य धुळीत मिळाले असून आपली रोजच मृत्यूशी झुंज सुरू आहे, असे भवानी परिसरातील रहिवाशांचे झाले आहे.

भवानी मंदिर परिसरातील स्टोन क्रशरचा आवाज व धुळीचे कण यावर हा रिपोर्ट..

अमरावती महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रहाटगाव लगत वडगाव माहुरे मार्गावरील भवानी मंदिर परिसरात मागील तीन-चार वर्षांपासून अनेक जण आपले हक्काचे घर बांधून राहायला आले आहेत. या परिसरात जवळपास 17 ते 18 स्टोन क्रशर असून या भागात 24 तास धूळ उडते. खदानीचा भाग असणाऱ्या या परिसरातील क्रशर बंद करण्यात येईल तसेच खदानीही बंद होतील, असे अमरावती महापालिकेने स्पष्ट केल्यावर या भागात नागरिकांना महापालिकेने घर बांधण्याची परवानगी दिली. अमरावती-नागपूर महामार्गावर असणारा हा परिसर शांत आणि सुरक्षित असल्याने या भागात अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत उभी राहिली.

याभागातील स्टोन क्रेशर आता बंद होतील, असे घरात राहायला आल्यावर नागरिकांना वाटले असताना तीन-चार वर्षांपासून हे क्रशर बंद तर झालेले नाही. उलट या क्रशरची संख्या या भागात वाढायला लागली. सायंकाळी पाच वाजल्यापासून क्रशरवर दगड फोडण्याचे काम सुरू होते ते काम पहाटे चार आणि पाच वाजेपर्यंतही सुरूच राहते. सकाळी अर्धा-एक तास एखादी क्रशर बंद राहते. मात्र, पुन्हा दिवसभर या भागातील क्रशर धडधडायला लागतात आणि संपूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणात धुळीचे कण पसरतात. अनेकदा तर ही धूळ इतक्या मोठ्या प्रमाणात असते की थोड्या अंतरावर असणारी समोरची व्यक्ती ही या धुळीमुळे दिसेनाशी होते. या प्रचंड धुळीमुळे या भागातील रहिवाशांना श्वसनाशी संबंधित अनेक आजार जडले आहेत. इतकेच नव्हे तर भवानी मंदिर परिसरात घर बांधताना ठणठणीत असणारे देविदास भटकर आणि सुभाष इंगळे हे दोन व्यक्ती या भागात राहायला येताच अवघ्या काही महिन्यातच त्यांचा श्वसनाच्या आजारामुळे मृत्यू झाला.

आजही या परिसरात श्वसनाच्या आजाराने त्रस्त अनेक रुग्ण पाहायला मिळतात. या भागातील प्रत्येक घरात अगदी स्वयंपाक घरापर्यंत धूळ उडत आलेली दिसते. आमच्या जेवणातही धूळ असल्याचे या भागातील महिला सांगतात. या परिसरातील खदानी, स्टोन क्रशर बंद करण्यात येतील, असे अमरावती महापालिकेने स्पष्ट केल्यामुळेच आम्ही या भागात राहायला आलो. आज मात्र आमच्या आयुष्यात धूळ पसरली असून आम्ही दररोज मृत्यूशी झुंज देत असल्याच्या वेदना या परिसरातील अनेकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.

अमरावती महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने भवानी परिसरातील सर्व स्टोन क्रशर बंद करावे. किंवा आम्हाला आमच्या जागेचा आणि घराचा पूर्ण मोबदला देऊन आमची या मृत्यूच्या दाढेतून सुटका करून द्यावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details