अमरावती - बडनेरा विधानसभा मतदारसंघात अभिनेता भारत गणेशपुरे आणि बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. भारत गणेशपुरे यांनी शिवसेनाच नव्हे तर सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रिती बंड यांना निवडून देण्याची विनंती केली आहे. तर, शिव ठाकरेने रवी राणा यांना साथ देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
भारत गणेशपुरे विरुद्ध शिव ठाकरे अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत राहणारा आणि संवेदनशील अशा बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रिती बंड या उमेदवार आहेत. त्यांची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा असणारे अपक्ष उमेदवार आमदार रवी राणा यांच्याशी थेट लढत आहे. बडनेरा मतदारसंघात नवरात्री उत्सवानंतर प्रचाराला जोर चढला असतानाच बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे याचा रवी राणा यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शिव ठाकरे हा अमरावतीचे रियल हिरो रवी राणा असल्याचे सांगत आहेत. युवकांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे आणि कुठलेही काम असले तरी एका फोनवर धावून येणारे रवी राणा यांना साथ देण्याची आता आपली वेळ आहे. त्यामुळे येत्या 21 तारखेला मतदानाच्या दिवशी टीव्ही या चिन्हासमोरील बटन दाबून रवी राणा यांना प्रचंड मतांनी निवडून आणू असे आवाहन शिव याने केले आहे.
हेही वाचा - अमरावतीच्या धामणगाव मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रताप अडसड अडचणीत
आमदार रवी राणा यांच्या समर्थनार्थ शिव ठाकरेंचा मतदारांना आवाहन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातच शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार प्रिती बंड यांच्या पाठीशी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहून त्यांना या निवडणुकीत आमदार म्हणून संधी द्यावी. दिवंगत संजय बंड यांना खरी श्रद्धांजली वाहण्याची हीच वेळ आहे असे भावनिक आवहान करणारा अभिनेता भारत गणेशपुरे यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतो आहे. 'माझ्यासारख्या कलाकाराला आज जे काही यश मिळाले आहे याचे खरे श्रेय संजय बंड यांना आहे. मुंबईत जेवणाची सोय नव्हती, राहायची सोय नव्हती अशा वेळेस संजय बंड यांचा आधार मिळाला. मीच नव्हे तर माझ्यासारख्या अनेक युवकांना संजय बंड यांनी आधार दिला. संजय बंड हे लहान मुलांपासून थोरांच्या हृदयात घर करून असल्यामुळे ते सर्वांचे संजूभाऊ झाले होते. आज प्रिती वहिनींनी निवडणूक लढण्यास होकार दिला आहे. अमरावतीतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्रित होऊन प्रिती बंड यांना साथ द्यायला हवी. मी कोणत्याही निवडणुकीत कोणाचाही प्रचार करीत नाही. मात्र संजय बंड हे माझ्यासह अनेकांसाठी खूप काहीतरी होते. त्यामुळेच प्रिती बंड यांच्या रूपाने संजूभाऊंना आम्हाला विधानसभेत पाहायचे आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. यामुळे ही संधी कोणीही गमावू नये अशी भावनिक विनंतीही भारत गणेशपुरे यांनी केली आहे.
हेही वाचा - मोदींची स्तुती करता आणि आमच्या भावना दुखावता; मुस्लीम नागरिकांचा आमदार रवी राणांना सवाल
सध्या भारत गणेशपुरे आणि शिव ठाकरे या दोघांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दोघांच्याही व्हिडिओची बडनेरा मतदारसंघासह संपूर्ण अमरावती शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
हेही वाचा - अमरावतीच्या धामणगावातील माताजी देवस्थानात नवरात्रोत्सवाचा जागर