अमरावती - थंड हवेचे ठिकाण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याची राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने एक वेगळीच ओळख आहे. चिखलदरालगत असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सेमाडोह, कोलकास आदी पर्यटन स्थळे ही पर्यटकांचे खास आकर्षण असून पावसाळ्यात चिखलदऱ्याला पर्यकांची विशेष गर्दी असते. पण, यावर्षी जून महिनाही जवळपास कोरडा गेल्याने राज्यातील हजारो पर्यटकांनी चिखलदऱ्याकडे पाठ फिरवली. याचा थेट परिणाम येथील व्यवसायावर झाला आहे.
जून महिन्याची चाहूल लागली की, राज्यभरातील हजारो पर्यटकांची पाऊले मेळघाटच्या दिशेने वळतात. कारण सातपुडा पर्वताच्या कुशीत दडलेला निसर्गाचा अदभुत खजिना मेळघाटला लाभला आहे. समुद्र सपाटीपासून एक हजार पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या घनदाट जंगलात वसलेल्या चिखलदरा पर्यटनक्षेत्राची एक वेगळीच ओळख आहे. दऱ्या खोऱ्यातून निघणारी वाट, धूके, रिमझिम बरसणाऱ्या सरी, दूरवर पसरलेला डोंग, हजारो फूट उंचीवरून दरीत कोसळणारे धबधबे हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. पण यावर्षी पावसाळा लांबल्याने येथील वातावरणातही बदल झाला असून काही पर्यटक नाराज होऊन परत गेले. तर काहींनी चिखलदऱ्याकडे पाठ फिरवली.