अमरावती : इजिप्तच्या वास्तूकलेचे काहीसे साम्य असलेल्या या वास्तूची निर्मिती इसवी सन 600 मध्ये झाल्याचे गावकरी सांगतात. मात्र या बारवची निर्मिती नेमकी कधी झाली याबाबत अनेक मत समोर येत आहेत. तरी इतिहासकारांनी संशोधनाद्वारे तळेगाव दशासर येथील बारव ही मध्ययुगात म्हणजेच इसवी सन बाराशेच्या दरम्यान निर्माण करण्यात आली अशी माहिती दिली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इतिहास अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. संतोष बनसोड 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
विटा, सिमेंट, रेतीचा वापर नाही :या विहिरीच्या समोर हनुमानाचे मंदिर आहे. मात्र हे मंदिर अलीकडच्या काळात बांधले असून हे मंदिर बांधण्यासाठी सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. बारव निर्माण करताना मात्र विटा, सिमेंट, रेती, यांचा वापर करण्यात आलेला नाही हे स्पष्ट दिसते. दगड कोरून आणि ते एकमेकांवर ठेवून या विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. या विहिरीसाठी वापरण्यात आलेले दगड हे मध्ययुगीन कालखंडातील आहे. त्या काळात ज्या काही विहिरी मशिदी, दर्गे आणि मंदिरांचे बांधकाम झाले त्या सर्व बांधकामांमध्ये ज्या प्रकारचे दगड वापरण्यात आले, तसेच दगड या पाय विहिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात आले असल्याचे डॉ. संतोष बनसोड यांनी स्पष्ट केले. यामुळेच ही विहीर मध्ययुगीन कालखंडातील आहे. याबाबत एक मत निश्चित करता येते असे देखील डॉ. संतोष बनसोड म्हणतात.
पाय विहिरीला बाराही महिने पाणी :तळेगाव दशासर या गावात असणाऱ्या दोन्ही पाय विहिरींना बाराही महिने पाणी राहते. हनुमान मंदिरा मागे जी मोठी बारव आहे. त्या बारवच्या निर्मिती दरम्यानच या ठिकाणी महादेवाची पिंड आणि काही दगडांच्या मूर्ती मुर्त्या घडवून ठेवण्यात आल्या आहेत. अनेकदा पावसाळ्यात ही विहीर पाण्याने तुडुंब भरते, तेव्हा महादेवाचे मंदिर पाण्यात बुडून जाते. मुघल काळापासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1970 पर्यंत तळेगाव दशासर परिसरातील रहिवासी याच पाय विहिरीतून पिण्यासाठी पाणी वापरायचे.
पाण्यावर तरंगणाऱ्या विटा :तळेगाव दशासर या गावासह लगतच्या परिसरात लहान-मोठी शेकडो मंदिरे आहेत. या परिसरात चक्क पाण्यावर तरंगणाऱ्या विटा आढळतात. तळेगाव दशासर येथील ग्रामस्थ पाण्यावर तरंगणाऱ्या विटेला खंगरी वीट असे म्हणतात. भगवान श्रीरामाने समुद्रात तरंगणाऱ्या दगडांद्वारे रस्ता बांधला होता. या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर त्या काळात देखील तळेगाव दशासर परिसरात आढळणाऱ्या विटांप्रमाणेच दगडांची निर्मिती केली असावी असे प्रा.डॉ संतोष बनसोड म्हणाले. तळेगाव दशासर परिसरात ज्या काही पाण्यावर तरंगणाऱ्या विटा बनतात त्यांची निर्मिती विशिष्ट प्रकारे करण्यात आली.