अमरावती: मेळघाटातील धारणी तालुक्यात येणाऱ्या बोड या गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनात नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत बांबू हस्तकला गत वर्षभरापासून सुरू झाले आहे. या बांबू हस्तकला केंद्रात बांबूचा झेंडा, बांबूची चटई, बांबू ट्रे यांच्यासह बांबू हेअर पिन, बांबूचे क्लचर आणि हेअर रिंग्स तयार केले जातात. गावातील एकूण 30 महिलांना बांबू हस्तकला केंद्राच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बोड या दुर्गम आदिवासी गावातील दहा महिलांना वर्षभरापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचपली या ठिकाणी असणाऱ्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात बांबूपासून महिलांच्या उपयोगात येणाऱ्या अलंकारांसह विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे प्रशिक्षण घेतल्यावर दहा महिलांनी गावातील इतर वीस महिलांना बांबूच्या विविध वस्तू निर्मितीसाठी प्रशिक्षित केले. बोड गावातील एकूण 30 महिला आणि युवती ह्या बांबूच्या विविध वस्तू बनविण्यात कुशल झाल्या आहेत.
होळीच्या पर्वावर प्रचंड मागणी: मेळघाटात होळी हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणून साजरा केला जातो. होळीच्या निमित्ताने अनेक गावात यात्रा भरते. या यात्रेत आमच्या केंद्राच्या महिला बांबूच्या विविध वस्तूंसोबतच बांबूने तयार करण्यात आलेल्या आभूषणाची विक्री करणार आहेत. यात्रेत येणाऱ्या युवती आणि महिला मोठ्या प्रमाणात बांबूने तयार करण्यात आलेले आभूषण खरेदी करतात. यामुळे 30 महिलांना चांगली आर्थिक मदत होते, असे या केंद्राच्या प्रतिनिधी सविता धारेकर यांनी सांगितले.