अमरावतीbamboo farming profit : राहू गावातील प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांवर प्रचंड विश्वास असणं हे या गावातील सकारात्मक वैशिष्ट्य होय. गावाच्या हितासंदर्भात गावातील प्रत्येक व्यक्तीचे मत घेऊन ग्रामसभा निर्णय घेते. 2014 च्या वनहक्क कायद्यानुसार जंगलातील संसाधनावर आदिवासींनाही हक्क आहे, या जाणिवेतून ग्रामसभेनं जंगलातील बांबू कटाई संदर्भात वन विभागाकडं प्रस्ताव सादर केला. वनविभागानं हा प्रस्ताव मान्य केल्यावर बांबू कटाई संदर्भात ग्रामस्थांनी एक समिती तयार केली. या समितीच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीचं पहिलं पाऊल पडलं, असं बांबू कटाई समितीचे सदस्य मुंगीलाल भुसुम यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. तसंच पहिल्या वर्षाला 22 लाख रुपयांचा लाभ झाला होता. तर आज वर्षाला 1 कोटींचा नफा गावाला होत असल्याचंही ते म्हणाले.
अंदाजपत्रकानुसार होते बांबू कटाई : शासनानं 2016 मध्ये राहू गावालगत असणाऱ्या साडेचार हेक्टर जंगलाचं सर्वेक्षण करून या जंगल परिसराचे चार भाग केले आहेत. या चारपैकी कुठल्याही एका भागात प्रत्येक वर्षी किती बांबू कटाई करायची याचे अंदाजपत्रक वनविभागाच्या वतीनं राहू ग्रामपंचायतला सादर केले. या अंदाजपत्रकानुसार बांबू कटाई समिती जंगलात बांबू कटाई करते. राहू गावातील ग्रामस्थांसह लगतच्या गावातील लोकांनादेखील या कामातून रोजगार प्राप्त होतो. फेब्रुवारी, मार्च, आणि एप्रिल अशा तीन महिन्याच्या काळात चालणाऱ्या बांबू कटाई कामांमध्ये एक व्यक्ती सुमारे वार्षिक 75 ते 80 हजार रुपये कमवतो.
बांबुला मोठी मागणी :राहू गावच्या वेशीवर जंगलात बराच लांबपर्यंत बांबूच्या थप्प्या लागलेल्या दिसतात. या भागात मानवेल प्रजातीचा बांबू आहे. अतिशय मजबूत आणि टिकाऊ असणाऱ्या या बांबूची किंमत 45 ते 50 रुपये इतकी आहे. अमरावती, नागपूर यासह मध्य प्रदेशातील खंडवा, बैतूल या भागात या बांबूला मोठी मागणी आहे. दरवर्षी या बांबूंचा सर्रास वापर केला जातो. बांबूच्या एका गठ्ठ्यासाठी दोनशे रुपयांपासून खुली बोली सुरू होते, अशी माहिती मुंगीलाल भुसुम यांनी दिली.