मुंबई -खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हनुमान चालीसा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा प्रकरणानंतर खार पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला होता. राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिले असताना देखील हजर न झाल्याने अखेर आज जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले.
काय आहे प्रकरणसध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला.