अमरावती : मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी बांधवांच्या चिमुकल्यांना शासनाकडून मोफत पुस्तके मिळतात. मात्र वर्षभर लागणारे शालेय साहित्य जंगलात कुठेही उपलब्ध होत नाही. चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या सलोना सर्कलमधील एकूण 14 शाळांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने, यावर्षी दऱ्याखोऱ्यात आणि पहाडाच्या उंच टोकांवर वसलेल्या सर्व गावातील शाळांच्या दारी जाऊन 1198 चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांच्या हाती लाभलेल्या या शालेय साहित्यामुळे शिक्षकांना देखील आनंद झाला आहे. ( Guardianship of 14 schools in Melghat )
असा आहे हा उपक्रम : अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्था ही 2012 पासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. गत चार वर्षांपासून मेळघाटातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी संस्थेने पुढाकार घेतला. गतवर्षी या चौदाही शाळेतील विद्यार्थ्यांना घटांग या गावात एकत्र करून त्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेची गरज ओळखून त्यांना हव्या असणाऱ्या गरजेच्या वस्तू देखील संस्थेच्या वतीने देण्यात आल्या. विशेष म्हणजे कधी नव्हे ते पहिल्यांदाच या चौदाही शाळेतील चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन देखील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावर्षी शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात होताच प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाच्या वह्या, रजिस्टर तसेच पेन, पेन्सिल, कंपास असे सर्वच महत्त्वपूर्ण साहित्य वितरित करण्यात आले.
सलग दोन दिवस चालला उपक्रम: सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घटांग, मसुंडी, बेला, कोहना, जैतादेही, बिहाली, हत्तीघाट, सलोना, भवई, जामलीवन, ढोमणीफाटा, लवादा आणि भांद्री या 14 गावांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गतवर्षी 14 शाळेतील एकूण 250 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले होते. यावर्षी मात्र शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला हा लाभ मिळाला आहे. गतवर्षी ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले होते, त्यांच्या शिक्षणात प्रगती जाणवली असल्याची माहिती, घटांग येथील आदर्श शिक्षक वैजनाथ इप्पर यांनी दिली.