अमरावतीBahiram Bua Yatra:सातपुडा पर्वत रांगेत उंच शिखरावर अकरावी करा स्वरूपात बहिरम बाबांची मूर्ती विराजमान आहे. (Bahiram Baba Temple) हजारो वर्षांपूर्वी अगदी सुपारीच्या आकाराची असणाऱ्या ह्या मूर्तीने कालांतराने आकराळ विक्राळ स्वरूप धारण केल्याचे बोलले जाते. या मूर्तीला लोणी आणि शेंदूर लावण्यात येतो. (Satpura Mountains)
अशी आहे आख्यायिका:सातपुडा पर्वत रांगेत असणाऱ्या सालबर्डी येथून शंकर आणि पार्वती दरवर्षी पंचमढीला जात असतात. या प्रवासात तीन दिवस त्यांचे बहिरम परिसरात वास्तव्य असते, अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार शंकराने पार्वतीच्या आंघोळीसाठी या भागात काशीच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तलाव बनविला होता. या तलावाचे नाव काशी तलाव असून हा तलाव आज देखील या परिसरात आहे. यासह शंकर आणि पार्वती आपल्या गणांसह या भागात मुक्कामाला असल्यामुळे त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी एका तलावातून भांडी बाहेर यायची. या तलावाला भांडे तलाव असे आज देखील म्हटल्या जाते. शंकर आणि पार्वती सोबत असणाऱ्या एका बहिरम नावाच्या भैरवाने या परिसराचा उद्धार व्हावा अशी इच्छा शंकराकडे व्यक्त केली. तेव्हा या स्थानावर तुझ्या रूपाने माझाच वास राहील असा आशीर्वाद शंकराने बहिरमाला दिला. तेव्हापासून या भागात बहिरमबुवाची पूजा केली जात असल्याची आख्यायिका आहे.
शेतकऱ्यांची यात्रा म्हणून प्रसिद्ध:बहिरम या स्थानाबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जात असल्या तरी या ठिकाणी अनेक वर्षांपासून बहिरम बुवाच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील पीक आल्यावर आणि हाती पैसा आला की शेतकरी बहिरम बुवाच्या यात्रेत यायचे. शेतीसाठी उपयुक्त अवजारे या यात्रेत मिळायची. लगतच्या आदिवासी भागातील अनेक आदिवासी जमातींचे कुळदैवत हे बहिरम बुवा असल्यामुळे आदिवासी समाजाची गर्दी देखील या यात्रेत मोठ्या संख्येने राहते.