अमरावती -राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या असून आता अनेक गावांत सरपंच विराजमान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातही ५३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून सरपंचांनी पदभार स्वीकारले आहेत. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी गावांतील सरपंच-उपसरपंच या दोन्ही महिलाच्या जोडीने नवा एक धाडसी निर्णय घेऊन कमालीचा उपक्रम सुरू केला आहे आणि तो उपक्रम आहे सक्तीच्या कर वसुलीचा. पाच दहा वर्षे नव्हे तर १७ वर्षांपासून ज्या ग्रामस्थांकडे कर थकला आहे, त्यांचाही कर आता वसूल केला जातोय. कारण या दोन्ही महिलांना आपलं गाव आदर्श करायचं आहे. त्यांच्या गावाला एका उंचीवर नेण्याचं कार्य करायचं आहे. त्यासाठी सरपंच विजया चवाळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारताच 'घर कर भरा, गाव समृद्ध करा' हे अभियान सुरू केलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे हे छोटसं गाव या गावातील ग्रामस्थांकडे गेल्या अनेक वर्षांपासून लाखो रुपयांचा घरपट्टी कर पाणीपट्टी कर थकीत आहे. त्यामुळे गावाचा विकास थांबला आहे. गावाचा विकास करायचा असला तर प्रत्येकाने घरपट्टी, पाणीपट्टी कर भरणे गरजेचे आहे. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व ग्रामस्थांच्या नकारार्थी पणामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो गावांतील ग्रामस्थांवर लाखो रुपयांचा टॅक्स हा बाकी आहे. दरम्यान गावाची परिस्थिती बदलायची असेल गावाला आदर्श करायचं असेल तर घर टॅक्स जमा केलाच पाहिजे, हा निर्धार डोळ्यासमोर ठेवून नवनिर्वाचित सरपंच विजया चवाळे व उपसरपंच सोनाली दांडगे या महिलांनी पदभार स्वीकारताच गावात घर टॅक्स वसूल करण्याची मोहीम सुरू केली.
महिला सरपंच-उपसरपंच बाईंची कमाल हल्ली ग्रामपंचायतचा घर टॅक्स वसूल करायचे झाल्यास कर्मचारी हे घरोघरी फिरून घर टॅक्स मागतात. परंतु त्यांना फारसा प्रतिसाद देत नाही. मात्र सरपंच विजया चवाळे या स्वतः रस्त्यावर उतरल्या असून त्यांच्यासोबत उपसरपंच सोनाली दांडगे व सचिव डी आर ईसळ हे देखील सहभागी असून घरोघरी जाऊन त्यांनी करवसुलीसाठी पदर खोचला आहे. केवळ अकरा दिवसात त्यांनी एक लाखांपेक्षा जास्त कर वसुली केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस गावात 100 टक्के वसुली करण्याचा त्यांचा निर्धार आहे. लोकांचा चांगला मिळतोय प्रतिसाद -
सरपंच विजय चवाले व उपसरपंच सोनाली दांडगे व सचिव डी आर ईसळ हे जेव्हा कर वसुलीसाठी जातात, तेव्हा अनेक ग्रामस्थ यांना प्रश्न करतात. त्यावेळी त्या गावाच्या विकासासाठी आपण हा कर भरला पाहिजे, आपण जर कर भरला तरच गावाचा विकास होऊ शकतो. कर भरण्याचे महत्व हे सर्वजण गावकऱ्यांना पटवून सांगतात, त्यामुळे गावकरी ही त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना आपला घर टॅक्स देतात.
आदर्श गाव करण्याचे स्वप्न
ज्याप्रमाणे राज्यातील पाटोदा, हिवरे बाजार आदी गावे आदर्श झाले आहेत. त्याचप्रमाणे माझं बग्गी गाव देखील आदर्श झालं पाहिजे, असा निर्धार महिला सरपंच विजया चवाळे यांनी केला आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांकडून सक्तीने कर वसुली करून घेत आहे, असे त्यांनी सांगितलं.
दररोज चार तास वसुली
सरपंच विजया चवाळे व सोनाली दांडगे या दररोज सकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन ज्या लोकांकडे कर बाकी आहे. त्यांच्या घरी धडक देतात व त्यांना कर भरायला सांगतात. दररोज सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत हे कर वसुलीचा अभियान राबविण्यात येत आहे.