अमरावती -केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी निघालेले राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी यूपीच्या सीमेवर धौलपूरजवळ रोखला असल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडू हे दिल्लीत दाखल होऊ नयेत, म्हणून पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली सर्व मार्ग बंद करून आंदोलनकर्त्यांवर दडपशाही सुरू केल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी उत्तरप्रदेश सरकारवर केला आहे.
बच्चू कडूंचा यूपी पोलिसांवर दडपशाहीचा आरोप हेही वाचा -गुरुद्वारातील दर्शनानंतर बच्चू कडू पलवलकडे रवाना; रॅलीला प्रतिसाद, जागोजागी स्थानिकांकडून स्वागत
चक्का जाम असल्याचे कारण केले पुढे
राज्यमंत्री बच्चू कडू कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी हजारो समर्थकांसोबत दुचाकीने दिल्लीला निघाले आहे.आज मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथून भरतपूरमार्गे पलवलला जाण्यासाठी बच्चू कडू यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला आहे. पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे यूपी पोलिसांनी कारण पुढे केल्याने पर्यायी भरतपूरमार्गे ताफा नेण्यास सांगितले. परंतु भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग यूपी पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने भरतपूरलाच गुरुद्वारात आज या आंदोलकांचा मुक्काम आहे.
समर्थन मिळत असल्याने पोलिसांची दडपशाही
महाराष्ट्राचे मंत्री बच्चू कडू यांना जागोजागी जबरदस्त समर्थन मिळत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार धास्तावले असून बच्चू कडू यांना यूपीत प्रवेशच मिळू द्यायचा नाही, या हेतूने त्यांचे सर्व मार्ग रोखले जात आहेत, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. दरम्यान, हा ताफा उत्तर प्रदेशात दाखल होत आज हजारो समर्थकांचा मथुरा-वृंदावनला मुक्काम होता. मात्र, आता भरतपूरला मुक्काम केला जाणार असून उद्या सकाळी हजारो समर्थकांचा ताफा पलवलच्या दिशेने रवाना होणार आहे.
हेही वाचा -मोदीजी खून लो.. मगर जान मत लो! रक्तदान करत बच्चू कडूंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा