अमरावती - वादग्रस्त विधान आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे समीकरण नवीन नाही. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या विधानावर महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केला आहे. आता दानवे यांना घरात जाऊन घुसून मारावं लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
रावसाहेब दानवे मूळचे हिंदुस्थानचे की पाकिस्तानचे-
रावसाहेब दानवे मूळचे हिंदुस्थानचे की पाकिस्तानचे याचा डीएनए तपासावा लागेल. आधी दानवेंच्या घरावर आंदोलन केले. आता दानवे यांना घरात घुसून मारावं लागेल, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या या आरोपाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार प्रतीउत्तर दिलं आहे.
शेतकरी आंदोलनावर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका-
केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत लाखो शेतकरी मागील १३ दिवसांपासून आंदोलन करत आहे. परंतू या आंदोलनावर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका होत आहेत. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका करत या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा केला.
हा शेतकऱ्यांचा अपमान-
देशभरात या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा आहे, असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. अशा पद्धतीने दानवे बोलत असेल तर आता त्यांना घरात जाऊन माराव लागेल, असे बच्चू कडू म्हणाले.
विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट-
दरम्यान, विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने काल (बुधवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेत शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी राजा, सीपीएम पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. कृषी कायदे रद्द करण्याचे निर्देश राष्ट्रपतींनी सरकारला द्यावे, अशी विनंती सर्व नेत्यांनी राष्ट्रपतींकडे केली.
काय म्हणाले होते दानवे-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहेत. पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला.
या देशात आधी सीएए आणि एनआरसीमुळे उचकवण्यात आले. या कायद्यामुळे एक मुस्लिम तरी देशाबाहेर गेला का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हे आंदोलन बाहेरच्या देशाचं षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असंही दानवे म्हणाले. आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन देखील दानवें यांनी केले आहे.
हेही वाचा-विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, कृषी कायदे रद्द करण्याची विनंती
हेही वाचा-राज्य मंत्रिमंडळाने दिली शरद पवार यांच्या नावाच्या ग्रामसमृद्धी योजनेला मंजुरी