अमरावती- कोरोनामुळे हाताला काम नसल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर दुसरीडे जन्मत: दिव्यांग असलेल्या अनेक बांधवांच्या हाताला आजवर रोजगार मिळू शकला नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू व महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाने पाच दिव्यांग बांधवांना फिरते विक्री केंद्र भेट दिले आहेत.
दिव्यांग बांधवांना रोजगार मिळून ते आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न त्यांनी यावर्षी गांधी जयंती निमित्ताने केला आहे.
बच्चू कडू व खादी ग्रामोद्योगाकडून दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र भेट हेही वाचा-महात्मा गांधींची १५१वी जयंती : जगभरातून वाहिली जातेय आदरांजली
खादी ग्रामोद्योग भांडारच्या सहकार्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाच दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र भेट दिले. या फिरत्या विक्री केंद्राच्या माध्यमातून हे दिव्यांग परिसरातील २० गावात आपला खादी व्यवसाय सुरू करू शकणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. प्राथमिक स्वरूपात २० गावांमध्ये एक दिव्यांग हा खादी व्यवसाय सुरू करू शकणार आहे.
फिरते विक्री केंद्र दिव्यांगांना सुपूर्त करण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. दिव्यांगाना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी देशभरात असे उपक्रम राबविणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.