अमरावती -शुल्क भरले नाही म्हणून महाविद्यालय प्रशासनाने परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे तणावात आलेल्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बडनेरा येथे घडली आहे. अनिकेत अशोक निरगुडवार असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो बडनेरा येथील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी येथील बी.टेक अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. या घटनेमुळे बडनेरा खळबळ उडाली असून त्याच्या नातेवाईकांसह परिसरातील अनेक नागरिक महाविद्यालय प्रशासनाविरोधात कारवाई व्हावी, यासाठी बडनेरा पोलीस ठाण्यात धडकले आहेत. साईनगर परिसरातील अनुराधा कॉलनी येथील भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
असे आहे संपूर्ण प्रकरण - यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या रिधोरा या गावातील अनिकेत निरगुडवार असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बडनेरा पासून काही अंतरावर असणाऱ्या पाळा या गावातील वसुधाताई देशमुख फूड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात बीटेक चा अंतिम वर्षाचा तो विद्यार्थी होता. गुरुवारी अंतिम वर्षाची परीक्षा सुरू झाल्याने अनिकेत परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात आला होता. परीक्षा सुरू असतानाच महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेने त्याचा पेपर हिसकावला, अशी माहिती अनिकेत चे वडील अशोक निरगुडवार यांनी दिली. 17 हजार रुपये शुल्क भरले नसल्यामुळे तुला परीक्षा देता येणार नाही असे कारण प्राध्यापिकेने अनिकेतला सांगितले. परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे अनिकेत खचला होता. याबाबत त्याने सायंकाळी घरी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून वडिलांना झाला प्रकार सांगितला होता. अनिकेतच्या वडिलांनी त्याला धीर देत आपण पैसे भरून टाकू काळजी करू नको असे सांगितले. मात्र रात्री 10 वाजेच्या सुमारास अनिकेतने तो राहत असणाऱ्या साईनगर परीसरातील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, असेही अशोक निरगुडवार म्हणाले.