अमरावती - मसानगंजमध्ये वास्तव्यास असलेला एक छोटा व्यवसायिक गाडी खरेदी करण्यासाठी नागपुरात गेला. यावेळी त्याने सोबत पाच लाख रुपयांची बॅग घेतली होती. या व्यावसायिकाने एका रिक्षातून प्रवास केला. यादरम्यान, त्यांच्याकडून पैशांची बॅग रिक्षातच विसरली. याचसोबत बॅगमध्ये सही केलेला कोरा धनादेश देखील होता. मात्र रिक्षाचालकाने हे सर्व परत करून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.
व्यापाऱ्याला घडले माणुसकीचे दर्शन... रिक्षावाल्याने पैशांची बॅग केली परत
अमरावती शहरातील मसानगंज परिसरात उमेश गुप्ता यांचं छोटं गिफ्ट सेंटर आहे. याच व्यवसायातून त्यांनी पै-पै गोळा करून गाडी घेण्याचं स्वप्न पाहिलं. त्यातूनच नागपूरमध्ये गाडीचा व्यवहार झाला होता. यासाठी उमेश गुप्ता नातेवाईकांसह नागपूरला गेले.
काही वेळातच आपण पैशांची बॅग रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच या बॅगमध्ये एक सही केलेला कोरा धनादेश देखील होता. हे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली.
नागपुरातील टायगर ऑटो संघटनेत रिक्षा चालवणारा अब्दुल खान याच्या ही बाब लक्षात येताच त्याने ती बॅग परत आणून दिली. त्यानंतर उमेश गुप्ता यांनी रिक्षा चालकाला बक्षीस स्वरुपात पैसे दिले. मात्र, अब्दुलने ते नाकारले. अब्दुलने दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्याचा नागपूर जिल्हा प्रशासनाने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.