अमरावतीAshtmasiddhi pilgrimage :बाळ हे निरोगी दिसण्याकरिता अनेकजण विविध उपाय करतात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात महानुभाव पंथीयांचे प्रसिद्ध तीर्थस्थळ असणाऱ्या अष्टमासिद्धी येथे पालक बाळासाठी अनोख्या प्रथेचं पालन करतात. या ठिकाणी देवाला भोपळा वाहण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. अष्टमासिद्धी येथील तीर्थस्थळाच्या परिसरात विविध प्रजातींच्या भोपळ्यांचे वेल आढळतात. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर या तीर्थस्थळाविषयी आणि तेथील अनोख्या प्रथेविषयी आपण जाणून घेवूया.
अष्टमासिद्धीच्या परिसरात असे आहेत भोपळ्यांचे प्रकार :अष्टमासिद्धी या ठिकाणी गोल भोपळा, लांब भोपळा लांब गोल भोपळा, तांबडा भोपळा, कडू भोपळा आणि दुधी भोपळा असे विविध प्रकारच्या भोपळ्यांच्या प्रजातीच्या वेली आहेत. पूर्वी या परिसरात तुंबी भोपळादेखील आढळायचा. तुंबी भोपळ्याचा उपयोग गारुडी आपली बीण वाजवण्यासाठी करत. तसंच तुंबी भोपळ्याद्वारे पूर्वी वीणा हे वाद्य तयार केलं जायचं. आज मात्र तुंबी भोपळा हा नामशेष होण्याच्या मार्गावर असला तरी या ठिकाणी तो काही प्रमाणात आढळतो. तसंच गोल आकाराच्या मोठ्या भोपळ्यांचा उपयोग पाणी नेण्यासाठी पूर्वी केला जायचा. तसेच शेतात जमा होणारे बियाणे देखील या मोठ्या भोपळ्यामध्ये सुरक्षित ठेवले जायचे. आज अनेक शेतकरी आपल्या शेतात मोठ्या भोपळ्यांमध्ये विविध बियाणे साठवून ठेवतात, असं अष्टमासिद्धी येथील पुजारी वैभव करंजकर 'ईटीव्ही भारतशी' बोलताना म्हणाले.
अनेक आजारांवर भोपळा गुणकारी :अष्टमासिद्धी परिसरात तांबडा भोपळा मोठ्या प्रमाणात मिळतो. तांबड्या भोपळ्याच्या वेलीला पिवळी फुलं येतात. बाहेरून आणि आतून तांबड्या रंगाचा असणारा हा भोपळा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. मूत्ररोग, रक्तदोष यांचा नाश तांबडा भोपळा खाल्ल्यामुळं होतो. अष्टमासिद्धीसह विविध ठिकाणी आढळणारे कडू भोपळे देखील औषधी गुणधर्म जोपासणारे आहेत. दमा ,खोकला अशा आजारांवर कडू भोपळा रामबाण इलाज असून सूज, व्रण, पित्तज्वर यांचा नाश करण्यास देखील कडू भोपळे उपयुक्त ठरतात. कडू भोपळ्या सह त्याची पानं कुठल्याही प्रकारचे विष उतरविण्यासाठी उपयुक्त ठरतात.