अमरावती:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला औरंगजेबाची औलाद म्हणतात. तुम्ही विदेशी आहेत, असे म्हणतात. परंतु तुम्ही तरी इथले खरे रहिवाशी आहेत का? असा प्रति प्रश्न ओवेसी यांनी फडणवीस यांना केला. अमरावतीतील सभेत ते बोलत होते. भारतात राहणाऱ्या 130 कोटी लोकसंख्येपैकी सर्वच लोक 65 हजार वर्षांपूर्वी बाहेरून आले आहेत. त्यापैकी काही आफ्रिका, इराण, पूर्व आशिया आणि मध्य आशियामधून आले होते. आदिवासी मुळात भारतीय आहेत. जे इथले खरे रहिवाशी आहेत, असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
कोण खोटं बोलत आहे : अमरावतीच्या सभेत बोलताना एमआयएम पार्टीचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर प्रखर टीका केली. सध्या राज्यात चालू असलेल्या कारभारावरही त्यांनी सडकून टीका केली. ओवैसी यांनी यावेळी फडणवीसांवर खूप आगपाखड केली.राज्यात औरंगजेबचा वाद चालू आहे, त्यावर टीका करताना उपमुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना औरंगजेबाची औलाद अशा टीकास्त्र डागत असतात. फडणवीसांच्या या टीकास्त्रावर असदुद्दीन ओवेसींनी अमरावतीमधून जोरदार उत्तर दिले. लोकमान्य टिळकांच्या शब्दांचा दाखला देत ओवेसी म्हणाले की, टिळक म्हणाले होते की, ब्राह्मण हे आर्टिकमधून आले आहेत. हे प्रमाण मानल्यास एकतर फडणवीस खोटे बोलत आहेत किंवा लोकमान्य टिळक. भारतातील मूळ लोक असतील तर ते आदिवासी आहेत, बाकी सर्व स्थलांतरित झाले आहेत. लुकमान सलमान अन्सारी आणि अब्दुल मजीद अन्सारी या दोघांनाही बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. मात्र यावर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस किंवा गृहमंत्री फडणवीस काहीही बोलले नाहीत. पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, या पक्षांना आमच्या जीवापेक्षा आमच्या मतांवर जास्त प्रेम आहे.
मोदींवर निशाणा : अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही खासदार राणा यांना मतदान केले. मात्र दिल्लीत पोहोचताच त्यांनी आपले रंग दाखवून मोदींची बाजू घेण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आमचे पंतप्रधान इजिप्तमध्ये जाऊन तिथल्या मशिदीमध्ये जातात. परंतु भारतातल्या मशिदमध्ये मात्र कधीच येत नाही. माझे तुम्हाला आवाहन आहे की, चला आपण वाराणसीच्या मशीदमध्ये जाऊया. परंतु मला माहित आहेत ते माझ्यासोबत येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.