महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yashomati Thakur On Bhide : संभाजी भिडेंना रविवारपर्यंत अटक करा; अन्यथा...; यशोमती ठाकूर यांचा शासनाला इशारा - संभाजी भिडेला रविवार पर्यंत अटक करा

महात्मा गांधी आणि तिरंग्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेला रविवार पर्यंत अटक करावी, अशी मागणी अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकुर यांनी केली आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी राज्य शासनाला दिला आहे.

Yashomati Thakur On Bhide
यशोमती ठाकुर यांचा शासनाला इशारा

By

Published : Jul 29, 2023, 10:17 PM IST

संभाजी भिडेंबद्दल यशोमती ठाकुर यांची प्रतिक्रिया

अमरावती:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला रविवार पर्यंत अटक करावी. तोपर्यंत आम्ही शांत राहणार आहे. जर भिडेला अटक झाली नाही तर रविवारी सायंकाळी आम्ही तीव्र आंदोलन करणार, असा इशारा काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.


'या' कॉंग्रेस नेत्यांची उपस्थिती:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लिम असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेने शुक्रवारी सायंकाळी अमरावतीत केले होते. या वक्तव्यामुळे भिडे विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. आज अमरावती शहरातील राजकमल चौकात यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भिडेवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन केले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमटे, विलास इंगोले, माजी शहर अध्यक्ष किशोर बोरकर यांच्यासह काँग्रेस तसेच एनएसयुआय युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.


पोलीस उपायुक्तांना दिले निवेदन:राजकमल चौक येथे काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडे विरोधात आंदोलन केल्यावर आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त विक्रम साळवे यांना निवेदन सादर करण्यात आले. यामधून संभाजी भिडेला रविवार पर्यंत अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.


भिडेला देशातून तडीपार करा:संभाजी भिडे विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत. मात्र, पोलिसांच्या वतीने आमच्यावर दडपशाही आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. संभाजी भिडे हा तिरंग्याचा अपमान करतो, राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत अपशब्द बोलतो त्याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही हे दुर्दैव आहे. खरंतर राष्ट्रद्रोही असणाऱ्या भिडेला देशातून तडीपार करण्याची गरज असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

महाराष्ट्रही पेटवायचा आहे का?भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर जसे मणिपूर पेटवले तसे संभाजी भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्रही पेटवायचा आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. ते आज नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांचा अगदी उघडपणे अपमान करत आहेत. ते कधी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करत आले आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी संभाजी भिडेंवर कधीही कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. आता संभाजी भिडे यांनी आपल्या सर्व मर्यादा ओलांडत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

हेही वाचा:

  1. Nana Patole : मणिपूर पेटवले तसे भाजपला संभाजी भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्रही पेटवायचा का? - नाना पटोले
  2. Congress On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक; गुन्हा दाखल करून अटकेची मागणी
  3. Bhim Army Protest In Amravati: अमरावतीत संभाजी भिडे यांचा निषेध; भीम आर्मीने केले आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details