अमरावती : 'वरुड नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगारांना नियमित रोजगार देण्यात यावा. तसेच मासिक वेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे. मिळत असलेल्या वेतनामधे दरवर्षी वाढ करण्यात यावी', या प्रमुख मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव सुशिल बेले व सफाई कामगारांनी १२ जुलैपासून आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी वरूड नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी मागण्या मान्य करून सर्व कामगारांना नियमित कामावर घेण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही या कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ध दफन आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
जीव गेला तरी चालले, पण...
नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आपला विश्वासघात केला असल्याचा आरोप सुशील बेले व सफाई कामगारांनी केला. 'अर्ध दफन आंदोलनासोबतच आजपासून पुन्हा आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. आमचा जीव गेला तरी चालेल. परंतू मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही', असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.