अमरावती-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणाऱ्या विविध उपचारांचे व चाचण्यांचे दर जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार रुग्णालयांनी तसेच तपासणी केंद्रानी निश्चित केलेल्या दराप्रमाणेच रुग्णांकडून उपचाराकरीता व चाचण्यांकरीता आकारणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
कोरोना चाचणी, सिटीस्कॅन व इतर विविध प्रकारच्या आजाराच्या उपचाराकरीता व तपासणी, चाचण्यांकरीता जिल्हा प्रशासनाकडून दर निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा अंतर्गत शहरात तसेच ग्रामीण भागात निश्चित केलेल्या दराप्रमाणेच आकाराणी करण्यात येते किंवा नाही, हे तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनातील वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे पथक गठीत करण्यात आले आहेत. जिल्ह्यात त्यांच्याकडून नियमितपणे खासगी रुग्णालय व चाचणी केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत गैरप्रकार आढळून आल्यास अथवा ज्यादा दराने चाचण्यांची आकारणी केल्याचे आढळून आल्यास संबंधित रुग्णांना अधिकची रक्कम परतफेड करुन दिल्या जाणार आहे. एवढेच नाही तर गरज पडल्यास संबंधित रुग्णालयाचा, चाचणी केंद्रांचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो.
मशिनच्या क्षमता वैशिष्ट्यानुसार ही दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी 16 स्लाईसच्या मशिनसाठी दोन हजार रूपये, मल्टि डिटेक्टर सीटी (एम डी सीटी) 16 ते 64 स्लाईसच्या मशिनसाठी अडीच हजार रूपये, 64 स्लाईसहून अधिकच्या मशिनसाठी तीन हजार रूपये दर निश्चित केले आहेत.* या रकमेत सीटी स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सिटी फिल्म, पीपीई कीट, डिसइन्फेक्टेड, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी यांचा समावेश आहे. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे समान दर लागू राहतील. या आदेशापूर्वी जर एखाद्या तपासणी केंद्राचे दर कमी असतील, तर ते कमी दर लागू राहतील.
एचआरसीटी- चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सिटी मशिनद्वारे तपासणी केली ते नमूद करणे बंधनकारक आहे. कोणत्याही डॉक्टरच्या प्रिस्किप्शनशिवाय ही तपासणी करू नये. तपासणी करणा-या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे बंधनकारक आहे. ज्या रूग्णाकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा खासगी आस्थापनेने तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल तर हे दर लागू राहणार नाहीत.
तसेच रूग्णालये किंवा तपासणी केंद्रांनी एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर दर्शनी भागात लावणे, तसेच निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील. निश्चित दरापेक्षा जादा दर आकारणा-या केंद्रांवर कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, नपा मुख्याधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.