अमरावती : सहकार क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. भाजप समर्थीत शेतकरी परिवर्तन पॅनलच्या एकाही उमेदवाराला आपले खाते उघडता आले नाही. एकूण १८ पैकी १८ ही जागांवर काँग्रेस महाविकास आघाडी सहकार पॅनलचे उमेदवार बहुमताने विजयी झाले.
भाजपचा उडाला धुव्वा :सर्वांचे लक्ष लागून असलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीची येथील निवडणूक १८ जागेसाठी होती. त्यासाठी काँग्रेस व भाजप समर्थीत दोन पॅनल आमने-सामने होते. दोन्ही पॅनलचे एकूण ३८ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यामध्ये सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यायचे होते. यात भाजपच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला आहे.
तिवसा बाजार समितीवर एकहाती सत्ता :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने वर्चस्व कायम राखले आहे. यामध्ये १८ पैकी १८ ही संचालक निवडून येत ठाकूर यांनी सहकारातला दबदबा कायम राखला आहे. यामध्ये सोसायटी मतदारसंघात स्वप्नील केने, विनायक तसरे, विवेक देशमुख, जयकांत माहोरे, गजानन वानखडे, राजेश वेरूळकर, मनोज साबळे, मेघा गोहत्रे, वंदना पाटेकर, रवींद्र राऊत, मंगेश राठोड, ग्रामपंचायत मतदार संघात राजेंद्र मढवे, विशाल सावरकर, अशोक मनोहर, जितेंद्र बायस्कर, व्यापारी व अडते मतदार संघात कैलाश पनपालिया, तुळसीराम भोयर, हमाल व मापारी मतदार संघात मोहन चर्जन विजयी झाले आहेत. यशोमती ठाकूर व विजयी उमेदवारांची जल्लोषात रॅली काढण्यात आली. या निवडणुकीसाठी ८६८ मतदारांपैकी ८३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ९६.४२ आहे.