अमरावती -रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला बुधवारी रात्री अटक केली. विनीत अनिल फुटाणे (21) रा. खराळा, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पीडीएमसी रुग्णालयात कंत्राटी वार्डबॉय म्हणून कार्यरत होता. या आरोपीकडून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले असून या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी पोलिसांनी दोन डॉक्टरांसह 6 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील 15 लाख 14 हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता.
पीडीएमसीतील आयुसीयुमध्ये करीत होता काम -
विनीत हा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मेडीसीन आयुसीयुमध्ये कंत्राटी वार्डबॉय पदावर काम करीत होता. त्याची नेमणूक एका एजन्सीमार्फत करण्यात आली होती. तसेच तो एका खासगी कोविड रूग्णालयातीही काम करीत होता. त्याची माहिती घेवून त्याला काढून टाकण्यासंदर्भाचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात येईल, असे पीडीएमसीचे अधिष्ठाता अनिल देशमुख यांनी सांगितले.
दोन कंत्राटी हकालपट्टी -
रेडमेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींमध्ये तीन कंत्राटी वार्डबॉयचा समावेश असून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत वार्डबॉय आरोपी शुभम कुमोद सोनटक्के (24) रा. चपराशीपुरा याची कोविड हॉस्पिटलने कार्यमुक्त केल्याची माहिती सीएस श्याम सुंदर निकम यांनी दिली. तसेच महाविर हॉस्पिटलमध्ये वार्डबॉय असलेला शुभम शंकर किल्हेकर (24) रा. वडाळी याला रुग्णालयाने तातडीने काढून टाकले.