अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शेकडो विविध प्रजातीचे अनेक प्राणी आहे. पंरतु नेहमी या व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची वर्दळ असते. यामुळे हे प्राणी मुक्तसंचार करताना क्वचितच पाहायला मिळतात. पण, सध्या कोरोनामुळे पर्यटकांना येण्यास बंदी आहे. यामुळे हरिण, अस्वल, नीलगाय यांचे कळप जंगलात मुक्त संचार करताना पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत मेळघाट वसला आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. २२ फेब्रुवारी १९७४ ला भारतात एकूण ९ अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यात मेळघाटचा समावेश होता. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणातील वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. यात जास्त पर्यटक हे मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू, अमरावती, अकोला येथील असतात. पर्यटकांमुळे इतर प्राणी क्वचितच मुक्तसंचार करताना दिसून येतात.