अमरावती- दरवर्षी ७ मे रोजी मेळघाट व्याघ्रपकल्पात प्राणी गणना करण्यात येते. यंदाही येथे काल बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात आली. यात वनविभागाला ५४६ मचाणांवरून १७ हजार ५४२ प्राण्यांचे दर्शन झाले. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे वनविभागाकडून यंदा बाहेरील व्यक्तींना या उपक्रमात सहभाग नाकारण्यात आला.
दरवर्षी या उपक्रमात राज्यभरातील हजारो वन्यजीव प्रेमी सहभाग घेत असतात. याकरिता ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणू संक्रमणाच्या भीतीपोटी वनविभागाने बाहेरील कोणत्याही व्यक्तींना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश दिला नाही. प्राणी गणनेदरम्यान ३५ वाघ, ४४ बिबटे, ३५२ अस्वले, ७५२ गवे, १७२ रानकुत्री, असे तबल २७ प्रकारचे अनेक तृणभक्षी प्राणी आढळून आले आहेत.