अमरावती- देशात सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनाने देशात हातपाय पसरवायला सुरुवात केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बंद झाल्या होत्या. परंतु, राज्यात जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसे नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आता सुरू झाले आहेत. अलीकडेच सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी भाजपला गांभीर्य नसलेला पक्ष म्हटले होते. तसच दंडुका पडल्याशिवाय डोके ठिकाणावर येणार नाही, असेही म्हटले होते. सामनातील या टीकेला उत्तर देताना भाजपचे नेते माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. टिका करताना त्यांनी असंसदीय भाषेचा वापर केला आहे.
हेही वाचा-सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात, शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन
नेमके काय होत अग्रलेखात-
एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे. पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो. याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे.