अमरावती : खासदार अनिल बोंडे यांनी चुकीचे विधान करणाऱ्या व्याख्याते तुषार उमाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर आता शिवव्याख्याते तुषार उमाळे यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. मी चुकीचे वक्तव्य केले नाही आणि डॉक्टर अनिल बोंडे यांना घाबरणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे या दोघांमधील वाद पिकोपाला जाण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र्याची गळचेपी करण्याची सवय :भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याची सवय लागली आहे. त्यांच्या विचारधारेच्या विरोधात कोणी बोलला तर त्याला गप्प करायचे त्याला धमक्या द्यायच्या ही त्यांची सवय आहे. माझ्या अमरावतीच्या व्याख्यानात देखील तेच झाले असे तुषार उमाळे यांनी म्हटले आहे. मी माझ्या व्याख्यानात अमरावती संत गाडगेबाबांची भूमी आहे. तहाणलेल्यांना पाणी द्या, भुकेल्यांना अन्न द्या अशी शिकवण संत गाडगेबाबांनी दिली. मात्र आज अमरावतीचे वातावरण फिरले आहे. आता अमरावतीत तहानलेल्याला हनुमान चालीसा द्या, भुकेल्याला हनुमान चालीसा द्या, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मी बोलत होतो. पुढे बोलताना मी शिवाजी महाराजांची जाणीवपूर्वक अशी प्रतिमा तयार केली असल्याचे सांगितले, असे तुषार उमाळे यांनी सांगितले.
मरण आले तरी डॉक्टर माफी मागणार नाही :छत्रपती शिवाजी महाराजांना मुसलमानांच्या कत्तली करण्याशिवाय दुसरा उद्योगच नाही, अशी प्रतिमा आहे. महाराजांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ केवळ मुस्लिमांच्या कत्तलीत करण्याचे काम केले. दुसरे काहीच केले नाही. अशाप्रकारे महाराजांची चुकीची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक तयार केली आहे. मी हे असे बोलत असताना राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मला व्याख्यान सुरू होताच डिस्टर्ब करायला सुरुवात केली होती. पण दोन-तीनदा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर अचानक त्यांचा आवाज वाढला आणि ते म्हणाले हे शहाण्या तू मूर्ख आहे का? यावर मी त्यांना बोललो तुम्ही मूर्ख आहात का? हा स्टेज माझा आहे मी निमंत्रित वक्ता आहे. या ठिकाणी बोलण्याचे मला स्वातंत्र्य आहे.