अमरावती - रब्बी हंगामासाठी लागणारे पाणीच अमरावतीच्या केकतपूर शेत शिवारातील शेतकऱ्यांना न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तळेगाव ठाकूर येथे उपस्थित झालेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत या समस्येचा जाब विचारला.
अमरावती जिल्ह्यात मोझरीपासून काही अंतरावर केकतपूर तलाव आहे. या तलावाला मुबलक पाणी असून या पाण्याच्या भरोश्यावर मोझरी, गुरुदेवनगर, तळेगाव ठाकूर आदी गावातील शेतकरी रब्बी हंगामाचे पीक घेतात. मात्र, यंदाच्या रब्बी हंगामासाठी अद्यापही पाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाही. याबाबत त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाचे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविले, निवेदने दिले. मात्र, तरीही शेतकऱ्यांना रब्बी हंगाम कोरडाच राहिला. अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना समस्या न सुटल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला. यानंतर मंगळवारी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हरीश देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित झाले. त्यांच्यासमोर संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी चक्क अडीच तास या समस्येवर चर्चा करीत त्यावर उपाययोजना करण्याचा एकच प्रश्न उपस्थित केला.