महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील संत्री उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या; करार शेतीचा बळी..? - अमरावती संत्री करार शेती न्यूज

धनेगावमध्ये काही दिवसांपूर्वी एका संत्री उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली. फळांची बाग करार पद्धतीने दिल्यानेच या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली, असे मत शेतकरी आणि कुटुंबिय व्यक्त करत आहेत.

Orange Farming
संत्री शेती

By

Published : Dec 26, 2020, 11:32 AM IST

अमरावती - अंजगाव सुर्जी तालुक्यातील धनेगावच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याने ऐन वेळी व्यापाऱ्याने केलेल्या फसवणुकीमुळे व पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आत्महत्या केलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याने आठ दिवसांपूर्वी व्यापाऱ्यासोबत संत्रा पिकाचा करार केला होता. परंतु, त्या करारावर व्यापारी कायम न राहल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला आणि यावादात शेवटी शेतकऱ्याचा बळी गेला. संत्र्याच्या झालेल्या करारामुळेच या शेतकऱ्याचा बळी गेल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

अमरावतीतील जिल्ह्यातील संत्री उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या करार शेतीचा बळी असल्याची चर्चा आहे

करार पद्धतीने होते संत्रा बागांची विक्री -

देशात सध्या कृषी कायद्यांवरून जोरदार आंदोलन सुरू आहे. तीन कृषी कायद्यातील एक कायदा करार शेतीचा आहे. या माध्यमातून काही कंपन्या शेतकऱ्यांसोबत करार करून त्यांचा शेतमाल खरेदी करणार असल्याचे बोलले जात आहे. याला आंदोलक शेतकरी विरोध करत आहेत. या कायद्यामुळे करार शेती हा शब्द आता चर्चेत आला असला तरी, हजारो संत्रा उत्पादक शेतकरी हे गेल्या अनेक वर्षांपासून आपली संत्री हे करार पद्धतीनेच विकतात. मात्र, जेव्हा बाजार पेठेत संत्र्याचे भाव कोसळतात तेव्हा, संत्रा व्यापारी झालेल्या कराराप्रमाणे फळं खरेदी करत नसल्याचे शेतकरी सांगतात. याच करार पद्धतीमुळे अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.

व्यापारी करतात मनमानी -

अशाच पद्धतीचा करार अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीच्या धनेगाव येथील शेतकरी अशोक भुयार यांनी केला होता.अशोक भुयार यांच्या कडे पाच एकर शेतजमीन आहे. या पाच एकरवर त्यांचा संत्रा बगीचा आहे. यावर्षी त्यांनी एका व्यापाऱ्यासोबत करार केला होता. ११ डिसेंबरला २ लाख ५५ हजार रुपयांचा करार झाला होता. त्यापैकी व्यापाऱ्याने त्यांना ५० हजार आगाऊ दिले होते. उर्वरित पैसे हे १७ तारखेला संत्रा तोडणी झाल्यानंतर देण्याचे ठरले. मात्र, बगीच्याची तोडणी झाल्यानंतर व्यापारी २५ हजार रुपये कमी करण्याचा आग्रह करत होता, असा आरोप या शेतकऱ्याच्या मुलाने केला आहे. त्यातून त्यांचा वाद झाला व शेतकऱ्याने आत्महत्या केली.

अनेक शेतकरी आहेत करार पद्धतीचे बळी -

संत्री विक्रीच्या कराराची कहाणी इथेच संपत नाही तर याच गावातील संत्रा उत्पादक शेतकरी सुरेश येवले यांना ही याच करार पद्धतीने गंडवले आहे. त्यांच्याकडे एकूण २० एकर संत्री बाग आहे. मागील वर्षी याच बागेतील संत्री त्यांनी २५ लाख रुपयांना विकली होती. यावर्षी त्यांनी व्यापाऱ्यासोबत करार करून १० लाख रुपयांची संत्री देण्याचे ठरवले होते. त्यानंतर संत्राचे भाव कमी झाले. त्या व्यापाऱ्याने करार पूर्ण करण्यास नकार दिला. शेवटी सुरेश येवले यांनी ६ लाख रुपयांचा तोटा सहन करून केवळ ४ लाख रुपयांना बगीचा विकला. करार पध्दतीने संत्रा विकल्यानंतर व्यापाऱ्याने तिसरा हिस्सा अगोदर शेतकऱ्याला द्यावा लागतो आणि उर्वरित पैसे हे संत्री तोडणीच्या दिवशी, असा नियम या भागात चालतो. यावर्षी व्यापाऱ्यांनी खूपच कमी पैसे दिल्याचे शेतकरी सांगतात. संत्री तोडीच्या दिवशीही पैसे कमी करा, असा व्यापाऱ्यांचा आग्रह असतो. जर शेतकऱ्यांनी पैसे कमी केले नाही, तर व्यापारी करार मोडून बगीच्या टाकून देतात. या भितीपोटी अनेक शेतकरी पैसे कमीही करतात. संत्री करारानंतर भाव वाढले तर वाढीव भाव व्यापारी देत नाही मात्र, जर भाव कमी झाले तर शेतकऱ्यांना पैसे कमी करायला सांगतात. आमच्या गावातील संत्रा उत्पादक शेतकऱ्याने जी आत्महत्या केली, तो करार पध्दतीचाच बळी असल्याचे शेतकरी सुरेश येवले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details