अमरावती- एकीकडे शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करुन स्वच्छ भारत मिशन योजनेची जाहिरात केली जात आहे. मात्र, येथील दर्यापूर तालुक्यातील येवदा या गावात गेल्या कित्येक वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छता गृह बांधावे, ही मागणी गावकरी करत आहेत. परंतु अद्यापही शासनाने त्यांची मागणी मंजूर न केल्याने या गावातील रहिवासी नकुल सोनटक्के यांनी 14 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे. त्याचा आज सहावा दिवस उजाडला असून आंदोलक उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे.
सार्वजनिक स्वच्छता गृहच्या मागणीसाठी अमरावतीत उपोषण, आंदोलकाची प्रकृती खालावली - अमरावती बातमी
दर्यापूर तालुक्यातील येवदा या गावात गेल्या कित्येक वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छता गृह बांधावे ही मागणी गावकरी करत आहेत. परंतु अद्यापही शासनाने त्यांची मागणी मंजूर न केल्याने या गावातील रहिवासी नकुल सोनटक्के यांनी 14 ऑगस्ट पासून उपोषण सुरु केले आहे.
येवदा येथील गांधी चौक परिसरात स्वच्छतागृह बांधण्यात यावे यासाठी तीन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. परंतु प्रशासनाने लेखी आश्वासन देवूनही त्यावर कुठलीच कारवाई न केल्यामुळे अखेर दुसऱ्यांदा दिनांक १४ ऑगस्ट पासून नकुल सोनटक्के यांनी अन्नत्यागाचा मार्ग अवलंबला आहे.
मागील उपोषणा दरम्यान, ग्रामपंचायतीने तालुक्यातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नकुल यांना स्वच्छतागृह बांधून देण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडविण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे परत नकुल सोनटक्के यांनी अन्ननत्याग आंदोलन सुरू केले आहे.